अरूण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : पुण्यात काँग्रेस - राष्ट्रवादीमुळे भाजप , सेनेची यादी रखडलीय. कारण जोपर्यंत त्यांच्यातील आघाडीचा निर्णय होत नाही तोपर्यंत स्वतःचे उमेदवार जाहीर करायचे नाहीत अशी भूमिका भाजप, सेनेनं घेतलेली दिसतेय. उमेदवार टंचाईच्या काळात पत्ता कट झालेले ताकदवान मासे आपल्या गळाला लागतात का याची अपेक्षा हे पक्ष बाळगून असण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु असली तरी अपवाद वगळता कुणाचेच उमेदवारी अर्ज दाखल अजून झालेले नाहीत. भाजप - सेनेतील युती तुटल्यामुळे एव्हाना त्यांचे उमेदवार घोषित होणं अपेक्षित होतं. 


भाजपची तर ७० उमेदवारांची पहिली यादी तयार असल्याचं सांगण्यात येतंय. त्याचप्रमाणे शिवसेनेनंही आपल्या संभाव्य उमेदवारांची पहिली यादी तयार केलीय. मात्र त्यांच्या याद्या अजून पाकिटबंद आहेत. त्याचं कारण काँग्रेस - राह्ष्ट्रवादी आहेत. २ आठवडे उलटले तरी त्यांच्यातील चर्चेचं गुऱ्हाळ सुरूच आहे. त्यांची आघाडी होते कि नाही यावर भाजप - सेनेची अंतिम उमेदवार यादी ठरणार आहे. 


आज , उद्या करत काँग्रेस , राष्ट्रवादीच्या बैठकांवर बैठका सुरु आहेत. त्यांची आघाडी झाल्यास त्यांच्याकडील अनेक इच्छुकांना उमेदवारीस मुकावं लागणार आहे. आपली ताकद नसलेल्या ठिकाणी अशां नाराजांना पक्षात घेऊन संधी देण्याचा भाजप, सेनेचा मनसुबा आहे. 


त्यांची आघाडी झाली नाही तर तुल्यबळ किंवा वेळप्रसंगी सोयीचा उमेदवार द्यावा लागणार आहे. त्यामुळे एकीकडे प्रचाराला वेळ कमी असल्याची ओरड करतानाच उमेदवारी याद्या जाणीवपूर्वक दाबून ठेवण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे याबाबतचा संभाव्य धोका लक्षात घेता काँग्रेस ,राष्ट्रवादी कडूनही आघाडीचा निर्णय जाणीवपूर्वक लांबवला जात असल्याची देखील चर्चा आहे.