नाशिक : भाजपने नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीवर झेंडा फडकवला. निवडणुकीनंतर तातडीने गटनोंदणी करत स्थायी समिती बळकावण्यासाठी सेनेनं रिपब्लिकन पक्षाला सोबत घेतलं होतं. मात्र विरोधकांना त्यांच्याच खेळीत अडकवल्याने महासभेत विरोधक आक्रमक झाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिक महापालिकेत भाजप ६६, शिवसेना ३५, काँग्रेस ६, राष्ट्रवादी ६, मनसे ५, अपक्ष ३, रिपाइं १ असं संख्याबळ आहे. मात्र गटस्थापन करताना एका अपक्षाने शिवसेनेसोबत तर एका अपक्षाने मनसेसोबत नोंदणी केली होती. त्यामुळे स्थायी समिती सदस्य निवडीत भाजपला सभापतीपद मिळवणं अवघड होणार होतं.


शिवसेनेच्या गटनोंदणीला रद्दबातल ठरवल्याने प्रकरण न्यायालयात गेलं होतं. त्यामुळे स्थायी समितीची झालेली निवड प्रक्रिया न्यायोचीत नसल्याने विरोधक आक्रमक झाले होते. मात्र याच गोंधळात महापौर रंजना भानसी या सदस्यांची निवड घोषीत करून मोकळ्या झाल्या.


भाजपचे ९, शिवसेनेचे ४, इतर ३ अशी एकूण १६ सदस्यांची निवड झाली. विरोधकांनी याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पण या गोंधळातच महापौर भानसी यांनी नावांची घोषणा करत सत्कारही करून टाकला.


स्थायी समिती सदस्य निवडीवरून झालेला महासभेतला हा गोंधळ पाहता भविष्यात वादाचा आखाडा होण्याची चिन्हं आहेत. मात्र आता भाजपकडे एकहाती सत्ता आल्याने शहराच्या सर्वांगिण विकासाची अपेक्षा नाशिककर बाळगून आहेत.