प्यायल्या पाण्याला लातूरकर जागले!
काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून लातूरकडे पाहिले जात होते. मात्र, या बालेकिल्ल्याला भाजपने मोठा सुरुंग लावला आहे.
लातूर : काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून लातूरकडे पाहिले जात होते. मात्र, या बालेकिल्ल्याला भाजपने मोठा सुरुंग लावला आहे. काँग्रेसचे दिव्ंगत नेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी हा गड शाबूत ठेवला होता. मात्र, त्यांचे पुत्र अमित देशमुख यांनी हा गड कायम राखण्यात अपयश आले आहे. महापालिका निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारत काँग्रेसचा धुव्वा उडवला.
लातूरशहर महानगरपालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असून ३६ जागांवर भाजप, ३३ जागांवर काँग्रेस तर राष्ट्रवादी काँग्रेसला ०१ जागा मिळाली आहे. या ठिकाणी शिवसेनेला खातेही उघडता आलं नाही. याआधी शिवसेनेला ६ जागा येथे मिळाल्या होत्या.
भाजपच्या विजयाचं हे आहे कारण
२०१२साली झालेल्या निवडणुकीत भाजपला एकही जागा मिळाली नव्हती यंदा मात्र चित्र पूर्णपणे पालटलं. या निवडणुकीत भाजपनं लातूरमध्ये एकहाती सत्ता स्थापन केली आहे.
भाजपच्या या विजयाचं प्रमुख कारण हे जलदूत ट्रेन मानलं जात आहे. मागच्या वर्षी लातूरमध्ये पडलेल्या दुष्काळात सरकारनं रेल्वेनं मिरजहून लातूरला पाणी पाठवलं आणि लातूरकरांची तहान भागवली. सरकारच्या या धोरणाची प्रशंसाही करण्यात आली. सरकारच्या या धोरणाचा फायदा भाजपला लातूरमध्ये सत्ता आणण्यासाठी झाल्याचं बोललं जात आहे.