पुणे : शरीर अपंग असलं तरी अशा लोकांमध्ये कोणतीतरी एक अदभूत अशी गोष्ट लपलेली असते. पंतप्रधान मोदी यांनी देखील यावरुन अशा व्यक्तींना अपंग म्हणण्यापेक्षा दिव्यांग म्हणावं असं म्हटलं होत. याच गोष्टीचा साक्षात्कार पुणेकरांना देखील झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय शरीरसौष्ठवातील ३० अव्वल पीळदार स्नायूंचे बलदंड देह आणि दिव्यांगत्वावर मात करून आखीवरेखीव शरीर कमावणारे खेळाडू याची देही याची डोळा पाहून पुणेकर भारावले. शरीरसौष्ठवाचे खरेखुरे ग्लॅमर काय आहे, हे दाखवणाऱ्या या थरारात तामिळनाडूचा राजेंद्रन मणी रेल्वेच्या किरण पाटीलपेक्षा काकणभर सरस ठरला आणि त्याने ऐतिहासिक सणस मैदानावर  स्वयंभू श्रीचा मान पटकावला. या किताबाबरोबर त्याला ६ लाखांची बक्षीस रक्कम देखील मिळाली.



जगण्याच्या धावपळीत आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या लोकांमध्ये फिटनेसची आवड निर्माण क्हावी म्हणून हनुमान जयंतीचे औचित्य साधत आयोजित केलेल्या या थराराला तब्बल १० हजार क्रीडाप्रेमींची अभूतपूर्व उपस्थिती लाभली. शरीरसौष्ठवाचे ३० सुपरस्टार स्वयंभू श्रीच्या ब्लॉकबस्टर थरारासाठी एकाच मंचावर आले आणि त्यांनी पुणेकरांची मनं जिंकली. विक्रमी पुरस्कार रकमेच्या या स्पर्धेत महाराष्ट्राचा महेंद्र चव्हाण सातवा आला.



सर्वच खेळाडू अव्वल असल्यामुळे टॉप टेन फार चुरशीची झाली. सहा ते दहा क्रमांकाची निवड झाल्यानंतर स्वयंभू श्री कोण ठरणार याची उत्सुकता साऱ्यांनाच लागून राहिली होती. जेतेपदाच्या शर्यतीत किरण पाटील, राजेंद्रन आणि यतींदरमध्येच खरी चुरस होती.


शरीरसौष्ठवाच्या इतिहासातील सर्वात श्रीमंत ठरलेल्या या स्पर्धेत विजेत्या राजेंद्रन मणीला सहा लाखांचा पुरस्कार खासदार अनिल शिरोळे, फाऊंडेशनचे अध्यक्ष सिद्धार्थ शिरोळे, विश्वस्त रणजीत कागदे, पुणे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार, आयबीबीएफचे अध्यक्ष प्रेमचंद डेगरा, सरचिटणीस चेतन पाठारे, राज्य संघटनेचे सरचिटणीस ऍड. विक्रम रोठे, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष वरूण श्रीनिवासन, सरचिटणीस शरद मारणे यांच्या उपस्थितीत पार पडला. या स्पर्धेत मुख्य गटात अव्वल पाच खेळाडू लखपती ठरले. तसेच इतर २० खेळाडूंना प्रत्येकी 20 हजारांचे उत्तेजनार्थ पुरस्कार देऊन स्वयंभू फाऊंडेशनकडून गौरव करण्यात आला.


स्वयंभू श्री २०१६ चे टॉप १०


1. राजेंद्रन एम. (तामिळनाडू), 2. किरण पाटील (रेल्वे), 3. यतिंदर सिंग (उत्तरप्रदेश), 4. जगदीश लाड (महाराष्ट्र), 5. बी. महेश्वरन (सेनादल), 6. एन. सरबो सिंग (रेल्वे), 7. महेंद्र चव्हाण (महाराष्ट्र), 8. बोरून यमनम (रेल्वे), 9. लवीन के. (रेल्वे), 10. विनीत शर्मा (पंजाब).


दिव्यांग स्वयंभू श्रीचे टॉप ५


1. दीपंकर सरकार (मध्य प्रदेश), 2. गोपाल साहा (प.बंगाल), 3. बिक्रमजीत सिंग (पंजाब), 4. इंद्रप्रकाश राव (महाराष्ट्र), 5.चौहान (महाराष्ट्र)