ड्रग्ज रॅकेटप्रकरणी ममता कुलकर्णीनंतर बॉलीवूड, टीव्ही कलाकारांकडे संशयाची सुई
आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट प्रकरणात बॉलीवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि तिचा पार्टनर विकी गोस्वामी हे मुख्य आरोपी असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
ठाणे : आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट प्रकरणात बॉलीवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि तिचा पार्टनर विकी गोस्वामी हे मुख्य आरोपी असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. यानंतर आता या प्रकरणामध्ये आणखी काही सेलिब्रिटी असल्याचा संशय ठाणे पोलिसांना आहे. या काही बॉलीवूड आणि टीव्ही कलाकारांची पोलीस चौकशी करत आहेत.
80 आणि 90 च्या दशकामध्ये चित्रपटांमध्ये काम केलेल्या व्यक्तीबाबत काही धागेदोरे आम्हाला मिळाले आहेत. या धाग्यादोऱ्यांना अनुसरून आम्ही चौकशी करत असल्याचं ठाणे पोलिसांनी सांगितलं आहे. तसंच एक टीव्ही अभिनेत्री आणि काही छोट्या-मोठ्या कलाकारांची नावं समोर येत आहेत, त्यांच्याबाबतही चौकशी सुरु आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी एप्रिल महिन्यात सोलापूरमध्ये धाड टाकून परदेशामध्ये जाणारं ड्रग्ज जप्त केलं. 12 एप्रिलला ठाणे पोलिसांनी नायजेरीयाच्या एका व्यक्तीला अटक केली. या व्यक्तीची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी सोलापूरमध्ये 14 एप्रिलला धाड टाकली. या धाडीमध्ये ड्रग्जचं आंतरराष्ट्रीय रॅकेट कार्यरत असल्याची माहिती समोर आली.