उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये भोंदू बाबाच्या अमानुष मारहाणीत तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंदिरानगर भागात राहणाऱ्या आशा सुर्यवंशी या किन्नरने संतोष या अनाथ मुलाला दत्तक घेतलं होतं. सोमवारी रात्री संतोष विक्षिप्तपणे वागत होता, त्यामुळे आशाने, शरीफा या दुसऱ्या किन्नराच्या मदतीने त्याला वाल्मिकीनगर परिसरातल्या मनोज बाबा या भोंदूबाबाकडे नेले. 


त्याला भूतबाधा झाली असल्याचं सांगत या भोंदूबाबाने संतोषला त्याच्याकडे ठेऊन आशा आणि शरीफाला घरी जाण्यास सांगितलं. दुसऱ्या दिवशी सकाळी आशा संतोषला आणण्यासाठी गेली असता तिच्या हाती संतोषचा मृतदेह मिळाला. 


संतोषच्या पाठीवर बेदम मारल्याचे वळ, चटक्यांच्या असंख्य खुणा होत्या. त्या भोंदू बाबाने संतोषला भूत उतरवण्याच्या बहाण्याने बेदम मारहाण केल्याने संतोषचा जागीच मृत्यू झाला होता.


याप्रकरणी पोलिसांनी भोंदूबाबा, त्याचा मुलगा आणि भोंदूबाबाकडे तरुणास घेऊन जाणारा एक किन्नर अशा तिघांना अटक केली आहे. त्यांच्या विरोधात पोलिसांनी खून आणि महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.