कैलास पुरी, झी मीडिया पिंपरी चिंचवड :  पिंपरी चिंचवड शहरात सर्व ठिकाणी बीआरटी योजना यशस्वी झाली असली तरी मध्यवर्ती भागातून जाणारा निगडी ते दापोडी हा बीआरटी मार्ग बंद करण्याची नामुष्की महापालिका प्रशासनावर आलीय. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा चुराडा झालेल्या या मार्गाचा दोषी कोण असा सवाल उपस्थित झालाय


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 पिंपरी चिंचवड मधला मुंबई महार्गाला जोडणारा हा ग्रेड सेपरेटर. पिंपरी चिंचवड करांचा अभिमान. याच मार्गावर निगडी ते दापोडी हा साडे बारा किलोमीटरचा बी आर टी मार्ग गेली कित्येक वर्ष बांधून तयार आहे... गेल्या दोन वर्षात बीआरटी सेवा सुरू करण्यासाठी इथलं इतर कामही पूर्ण झालंय. त्याच्यावर 20 कोटी रुपये खर्च करण्यात आलेत. 
 
 पण आता हा मार्गच बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मुळात हा मार्ग चुकल्याची तक्रार करत काही जण न्यायालयात गेले होते. त्यामुळं रोड बंद होता. आता पालिका प्रशासनानं हा मार्ग दुचाकी साठी सुरु करत अप्रत्यक्षपणे बी आर टी बंद करण्याचा निर्णय घेतलाय. त्यावर नागरिकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्यात.


दरम्यान महापालिका प्रशासन अधिकाऱ्यांनी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बी आर टी मार्गातून दुचाकी वाहनांना परवानगी दिल्याचं सांगितलंय. 


पण कॅमेऱ्यावर मात्र अधिकाऱ्यांनी बोलायला नकार दिलाय. एकूणच काय तर ढिसाळ नियोजनामुळं शहरातल्या एका बी आर टी मार्गाचा फज्जा उडालाय आणि करदात्यांच्या कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालंय हे खरं...