पनवेलमध्ये घर घेणाऱ्या २०० जणांची बिल्डरकडून कोट्यवधींना फसवणूक
पनवेलमध्ये घराच्या बहाण्याने 200 जणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे.
नवी मुंबई : घर घेण्याचा तुम्ही विचार करत आहात का? तर जरा जपून आणि संपूर्ण माहिती घेऊनच घर घेताना पैसे गुंतवा. कारण, तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे. पनवेलमध्ये घराच्या बहाण्याने 200 जणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे.
फसवणूक झाल्याच्या विरोधात मोर्चा. बिल्डर विरोधात हा मोर्चा काढण्यात आला. आक्रोश होता तो फसवणुकी विरोधातला. घर देण्याच्या बहाण्याने कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप या ग्राहकांनी केलाय.
पनवेलच्या चिपळे गावमध्ये एका स्कीमच्या माध्यमातून सोसायटी उभारण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. चार मजली इमारतीमध्ये वन आणि टू बीएचके रुम उपलब्ध होत असल्यानं इथं शेकडो ग्राहकांनी 20 टक्के रक्कम देऊन घरं बुक केली.
साई प्रॉपर्टी सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीला ही इमारत उभारण्याचं काम देण्यात आले होते. मात्र सहा वर्षानंतरही कोणतही इमारत उभी राहिलेली नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचं लक्षात येताच या ग्राहकांनी आपले पैसे मागितले. मात्र त्यांना पैसे काही मिळाले नाही. काहींना चेक मिळाले. मात्र ते बाऊन्स झाले.
या स्कीममध्ये अनेक निवृत्त नौदल कर्मचा-यांनीही गुंतवणूक केलीय. पैसे परत मिळावे यासाठी या सगळ्यांनी मोर्चा काढत पोलिसांतही तक्रार दाखल केली आहे. ग्राहकांनी साई प्रॉपर्टी सर्व्हिसेस लिमिटेडच्या ऑफिसवर मोर्चा नेला त्यावेळी मालक असलेल्या बिल्डरने त्यांना धमकावले. पोलीस किंवा मीडियात जाल तर पैसे परत मिळणार नसल्याची धमकी त्यांनी दिलीय.
याबाबत बिल्डर शंकर नागरेची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रतिक्रिया न देता तिथून निघून जाणं त्यांनी पसंत केलं. त्यामुळे आता फसवणूक झालेल्या ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलिसांनी कारवाई करण्याची गरज आहे.