मुकुल कुलकर्णी, नाशिक : बनावट नोटांचा छापखाना चालविणाऱ्या छबू नागरे आणि त्याच्या साथीदारांच्या पोलीस कोठडीत आज पाच दिवसांची वाढ करण्यात आलीय. आता नोटा छापण्यासाठी लागणारी मशीन आली कुठून? आणि त्याच्या टोळीच्या इतर साथीदारांचा शोध सुरु झालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिकमध्ये बनावट नोटा छापण्याच रॅकेट चालविणाऱ्या टोळींचा मोहरक्या छबू नागरे आणि त्याच्या 10 साथीदारांना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आलं. सहा दिवसांच्या पोलीस कोठडीच्या मुदतीत या अकराही संशयितांच्या घराची झडती घेण्यात आली. तसंच त्यांच्या मालमत्तेचा तपशील गोळा केला जातोय.


ब्युटी पार्लरमध्ये सुरू होता छापखाना...


ब्युटी पार्लरमध्येच चालणारा छबूचा छापखानाही पोलिसांनी उद्ध्वस्त केलाय. नाशिक आणि मुंबईेच्या विविध बँकांत छबुची १५ हून अधिक खाती असून त्यात ५० ते ६० लाख रुपयांची माया जमविल्याचं तसचं शहरात लाखो रुपयाची मालमत्ता असल्याचं तपासात उघडकीस आलं. त्यामुळे साथीदारांसह त्याची बँक खाती गोठविण्याला सुरुवात झाली असून यापुढे त्याच्या खात्यातून अर्थ व्यवहार करू नये, अशा सूचना पोलिसांकडून बँकांना करण्यात आल्यात.


कशा बनवल्या बनावट नोटा?


पोलिसांनी अकरा जणांची टोळीचा पर्दाफाश केला असला तरी नोटा बनविण्याचे कटिंग मशीन कोणी पुरविले? शाई कोणाच्या माध्यमातून आणि कुठून आणली? याचा शोध अजून नाशिक पोलिसांना लावता आलेला नाही. नोटा छपाईसाठी छबूने ज्या कागदाचा वापर केला होता तो कागद आणि चलनी नोटा बनविण्याचा कागद यात काय फरक आहे, हे तपासण्यासाठी करन्सी नोट प्रेसमधील तज्ज्ञांची मदत घेतली जातेय.


अजूनही गोष्टी गुलदस्त्यातच...


या टोळींचा पर्दाफाश केला असला तरी त्यांचे इतर साथीदार शोधण्यात अद्याप पोलिसांना यश आलेले नाही. या टोळीत आणखी काही जण सहभागी असल्याची शहरात चर्चा असताना त्यांची नावं का पुढे येत नाहीत? तसंच याच माध्यमातून आणखी किती नोटा छापल्या किवा त्याची विल्हेवाट लावली? ही सर्व माहिती अजूनही गुलदस्त्यात आहे. 


या प्रकरणात छबू इतकाच मुख्य सूत्रधार असणारा रामराव पाटील याच्या चौकशीतून घराच्या झडतीतून काहीच हाती लागलं नसल्यानं देखील आश्चर्य व्यक्त होतंय. गेल्या काही दिवसांपासून बनावट नोटा छापल्या जात असताना स्थानिक पोलिसांना त्याची खबर का लागली नाही? असे प्रश्नही उपस्थित होत असून त्याची उत्तर पोलिसांनाच द्यावी लागणार आहे.