महाराष्ट्रात धर्मपरिवर्तन करणाऱ्यांच्या संख्येत अचानक वाढ
महाराष्ट्रातल्या लोकांचं धर्मपरिवर्तन करण्याचं प्रमाण अचानक वाढलंय. या संदर्भातली धक्कादायक आकडेवारी समोर आलीय.
एहसान अब्बास, झी मीडिया, मुंबई : महाराष्ट्रातल्या लोकांचं धर्मपरिवर्तन करण्याचं प्रमाण अचानक वाढलंय. या संदर्भातली धक्कादायक आकडेवारी समोर आलीय.
महाराष्ट्र नगरीत सगळे धर्म गुण्यागोविंदानं नांदतात... आणि धर्म बदलतातही... महाराष्ट्रातल्या धर्मपरिवर्तनाच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झालीय. महाराष्ट्रात रोज दोन लोक धर्म परिवर्तन करतात असं आकडेवारी सांगते.
गेल्या तीन वर्षांत धर्मपरिवर्तन करणाऱ्यांची संख्या तिप्पट झालीय
- 2014 मध्ये महाराष्ट्रात 247 लोकांनी धर्मपरिवर्तन केलं
- 2015 मध्ये 615 नागरिकांनी धर्मपरिवर्तन केलं
- 2016-17 या वर्षात 797 नागरिकांनी धर्मपरिवर्तन केलं
अशी धक्कादायक आकडेवारी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी समोर आणलीय. महाराष्ट्राची लोकसंख्या साधारणपणे दहा कोटी इतकी आहे... यामध्ये हिंदू धर्मियांची संख्या सर्वाधिक आहे तर महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या पंधरा टक्के नागरिक इस्लाम, शीख आणि ख्रिश्चॅनिटी धर्माचे आहेत. महाराष्ट्रात धर्मपरिवर्तनाचा आकडा वाढल्याची माहिती जरी आरटीआयमधून मिळाली असली तरी कुठल्या धर्मातलं आऊटगोईंग आणि इनकमिंग वाढलंय, याची माहिती मिळालेली नाही. त्यामुळे धर्मरक्षकांचे धाबे दणाणलेत.
साधारणपणे लग्न, विविध योजनांचा लाभ मिळवून घेणं किंवा स्वतःची इच्छा या कारणांसाठी धर्मपरिवर्तन केलं जातं. त्यामुळे धर्म बदलला की नावही बहुतेक वेळा बदललं जातं आणि त्याची गॅझेटमध्ये नोंद केली जाते. 2014 मध्ये अशा पद्धतीनं 59 हजार लोकांनी नावं बदलून घेतली, त्या माध्यमातून सरकारी तिजोरीत 1 कोटी 48 लाख 85 हजार 492 रुपये जमा झाले होते, यावर्षी 1,82,977 लोकांनी नावं बदलली आणि सरकारी उत्पन्नाचा हा आकडा तब्बल 8 कोटी 37 लाख 21 हजारांवर गेलाय. धर्म बदलल्यानं एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात फायदा होतो की तोटा, ते माहीत नाही. पण या धर्मबदलांमुळे सरकारी तिजोरीचा मात्र चांगला फायदा होतोय.