जितेंद्र शिंगाडे, नागपूर : चोरी करण्यासाठी आलेल्या लुटारूंना एका महिला क्लार्कने तिच्या दबंग स्टाईलने पिटाळून लावलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

छाया जनबंधू नागपूरच्या कामटी रेल्वे स्थानकावर तिकीट बुकिंग क्लार्क म्हणून काम करतात... वय वर्ष 43... सध्या लेडी दबंग म्हणून त्यांची ओळख झालीय. त्याला कारणही तसंच आहे.


7 डिसेंबरच्या पहाटे 3 च्या सुमारास छाया नाईट शिफ्ट करत होत्या... तिकीट बुकिंग रूम मध्ये त्या एकट्याच होत्या... दोन दिवसांची सुट्टी असल्यामुळे तिकीट विक्रीचे सुमारे 10 लाख रुपये त्यांनी तिजोरीत ठेवले... आणि वॉशरुममध्ये जाण्यासाठी त्या बुकिंग रुमच्या बाहेर आल्या. बुकिंग रूमला कुलूप लावत असतानाच एका चोरट्याने त्यांच्या तोंडावर कापडाचा बोळा कोंबण्याचा प्रयत्न केला. काहीतरी अनुचित प्रकार आपल्यासोबत घडत असल्याचं लक्षात येताच त्यांनी त्या लुटारुवर जोरदार प्रहार केला... आणि अनर्थ टळला... 


छाया जनबंधू यांना सुरुवातीपासूनच खेळाची आवड... या क्षेत्रात त्यांनी अनेक पुरस्कारही पटकावलेत. विशेष म्हणजे 2010 च्या मलेशियामधळ्या एशियन गेम्समध्येही त्या सहभागी झाल्या होत्या. अॅथलेटिक्समध्ये त्यांनी अनेक वेळा रेल्वेचं प्रतिनिधित्व केलंय आणि याच जोरावर त्यांनी लुटारुंना चांगलाच धडा शिकवला... त्यांच्या या धाडसी कामगिरीमुळेच रेल्वे प्रशासनानेही त्यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव केलाय.


2014 मध्ये पतीच्या निधनानंतर अनुकंपा तत्वावर छाया यांना रेल्वेत नोकरी लागली... त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे... त्यांनी दाखवलेल्या या अभूतपूर्व धाडसाचं त्यांच्या सहकाऱ्यांनाही कौतुक आहे. 


छाया जनबंधू यांच्या धाडसामुळे रेल्वेचे पैसे चोरी होण्यापासून वाचले. मात्र, संकटकाळी एक सामान्य स्त्री परिस्थितीशी मुकाबला कशी करु शकते, हे छाया  जनबंधू यांनी दाखवून दिलंय.