अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर : लहान मुलांना मारहाण करून त्यांना भीक मागायला लावणाऱ्या टोळीचा नागपूर पोलिसांनी पर्दाफाश केलाय. १० अल्पवयीन मुलामुलींना या टोळीच्या तावडीतून पोलिसांनी सोडवलंय. या टोळीतील ३ महिलांना पोलिसांना अटक केलीय. तर उरलेले सदस्य फरार आहेत. हे मोठं रॅकेट असल्याचा संशय आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रस्त्यावर भीक मागणारी मुलं तुम्हाला दिसली तर सावध व्हा... कारण या मुलांना त्या भागातील टोळी भीक मागण्यास भाग पाडते. हे खरं वाटत नसलं तरी प्रत्यक्षात असं घडत आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये पोलिसांनी अशी एक टोळी उध्वस्त केलीय. 
 
अशा प्रकारचं रॅकेट नागपूरमध्ये अस्तित्वात असल्याचं लक्षात आल्याने जिल्हा बालसंरक्षण समितीने सर्वेक्षण केलं. त्यात य़ा टोळ्यांचं धक्कादायक वास्तव उघड झालं. 
 
३ ते १० वर्षे वयोगटातली मुलं मुलींना वापरून ही टोळी गोरखधंदा करते. या टोळीतला प्रत्येक बालसदस्य भीक मागून दिवसाला ५०० रूपयांची कमाई करतो. पैसे मिळाले नाहीत तर त्याला जेवण मिळत नाही, शिवाय मारही खावा लागतो.  


समितीच्या तक्रारीनंतर नागपूरच्या समाजसेवा शाखेने शहराच्या पंचशील चौकात कारवाई केली आणि १० मुलांसह तीन महिलांना अटक केलीय.  


भीक मागणाऱ्या या मुलांचा या टोळीशी नेमका काय संबंध आहे? याचा तपास सुरू आहे. आपल्याला मारहाण होत असल्याची प्रांजळ कबुली या लहानग्यांनी दिलीय. पोलिसांनी तीन महिलांना अटक केलीय. पण उरलेले पुरूष आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. ही मुलं आरोपींकडे कशी आली, त्यांचं आपापसात काय नातं आहे का याचाही शोध सुरू आहे.