नाशिक : नाशिकच्या शेतकऱ्यांनी आयातीच्या कठोर नियमांची पूर्तता केल्याने यावर्षी भारतीय द्राक्षांनी चीन आणि रशियाला भूरळ घातली आहे. एवढंच नाही तर जवळपास 36 देशांमध्ये 61,382 मेट्रीक टन द्राक्ष निर्यात केली आहेत. गेल्यावर्षीपेक्षा ही निर्यात आठशे कंटेनरने अधिक आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युरोपातील जर्मनी, नेदरलँड, युनायटेड किंगडमसह 17 देश, सिंगापूर, आखाती देश, रशिया अशा इतर 19 देशांमध्ये नाशिकच्या शेतक-यांनी पिकवलेल्या द्राक्षांनी मजल मारलीय. या देशांमध्ये दोन चार नव्हे तर तब्बल 4,460 कंटेनरमधून 61 हजार 382 मेट्रीक टन द्राक्षे निर्यात झाली आहेत. विशेष म्हणजे द्राक्ष निर्यातीतला आपला प्रमुख स्पर्धक असलेल्या चीननेच भारताकडून पन्नासहून अधिक कंटेनर द्राक्ष आयात केली आहेत. 


यावर्षी नाशिक जिल्ह्यात 34 हजार 11 शेतक-यांनी निर्यातक्षम द्राक्षांचं उत्पादन केलं. गेल्यावर्षीपेक्षा दहा हजार अधिक शेतकरी या व्यवसायात उतरले. 22 हजार हेक्टरपेक्षा जास्त लागवड झालेलं हे द्राक्षरूपी हिरवं सोनं देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळवून देत आहे. 


शेतक-यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावरच हे साध्य झालंय. या शेतक-यांना आता थेट नाशिकमधून कार्गो विमानसेवा मिळाली तर त्यांच्या कष्टाचं चीज होऊन शेतकरी आपली आपली कार्यक्षमता वाढवू शकतील.