मुंबई : राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या सकाळी अकरा वाजता होणार आहे. या विस्ताराआधी भाजप आणि शिवसेनेमध्ये चर्चांची खलबतं सुरुच आहेत. शिवसेनेला मिळणाऱ्या मंत्रीपदाबाबत शिवसेना नेते सुभाष देसाई आणि दिवाकर रावते यांनी मुख्यमंत्र्यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेपुढे दोन राज्यमंत्रीपद आणि एमएसआरडीसी मंत्री एकनाथ शिंदे यांना सार्वजनिक बांधकाम खातं द्यायची तयारी भाजपनं दर्शवली आहे. मुख्यमंत्र्यांची ही ऑफर घेऊन रावते आणि देसाई आता मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीला गेले आहेत. 


मातोश्रीवर थोड्याच वेळात शिवसेनेच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत शिवसेनेच्या भूमिकेवर लक्ष लागलं आहे. केंद्रातल्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला विश्वासात घेतलं नसल्यानं शिवसेना नाराज झाल्याचं बोललं गेलं. 


राज्यात मात्र भाजपकडे स्पष्ट बहुमत नाही. राज्यातल्या भाजप सरकारला हे अडचणीचं ठरू शकतं. येत्या पावसाळी अधिवेशनात शिवसेना भाजपला अडचणीतही आणू शकते. या सगळ्याचा विचार करून भाजपनं शिवसेनेशी चर्चा सुरु केल्याचं बोललं जात आहे.