मुंबई : काँग्रेस नेते नारायण राणे आणि विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची भेट घेतली. त्यानंतर सिंधुदुर्गातील डंपर चालकांचे आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राणे, विखे-पाटील यांनी सिंधुदुर्गातील डंपर मालक चालक संघटनेच्या मागण्या संदर्भात चर्चा केली. यावेळी सकारात्मक चर्चा झाली. मुख्यमंत्र्यानी मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती राणे यांनी यावेळी दिली.


मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर उद्या सकाळी डम्पर मालक चालक संघटना आंदोलन मागे घेणार आहेत. त्यामुळे गेले तीन-चार दिवस सिघळलेले आंदोलन शमणार आहे. दरम्यान, प्रशानसाच्या भूमिकेवर मुख्यमंत्र्यांनी काय निर्णय घेतला याची माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही.


पोलीस आणि महसूल खात्यातील अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून सिंधुदुर्ग जिल्हय़ातील डंपर चालक-मालकांनी बेमुदत आंदोलन पुकारले होते. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी शेकडो डंपर मुंबई-गोवा महामार्गावर उभे करून वाहतूक ठप्प करण्यात आली होती. त्यानंतर या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. 


पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला तसेच या प्रकरणात आमदार नितेश राणे यांच्यासह अन्य आंदोलकांना अटक करण्यात आली. त्यावरून सिंधुदुर्ग जिल्हय़ात तणावाचे वातावरण होते.