सांगली : जिल्ह्यात इस्लामपूर, आष्टा, तासगाव, विटा या पूर्वीच्या आणि नव्यानं अस्तित्वात आलेली पलूस अशा पाच नगरपालिका आहेत. तर कवठे-महांकाळ, कडेगाव, खानापूर आणि शिराळा या चार नगरपंचायती तयार करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी काँग्रेस किंवा राष्ट्रवादीची सत्ता होती. मात्र 2014 नंतर भाजप आणि शिवसेनेनं मोठं आव्हान निर्माण केलंय. (व्हिडिओ बातमीच्या खाली)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सांगली जिल्ह्यात भाजपचे एक खासदार आणि चार आमदार आहेत तर राष्ट्रवादीचे दोन आणि काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रत्येकी एक आमदार आहेत. विधानसभा आणि स्थानिक पातळीवरील नगरपालिकांच्या निवडणुकांमधील चित्रं वेगळं असलं तरी भाजप-सेनेची वाढलेली ताकद काँग्रेस आणि राष्ट्रवादीची डोकेदुखी ठरणारेय.


इस्लामपूर नगरपालिका - 
इस्लामपूर नगरपालिकेत सध्या जयंत पाटलांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीची सत्ता आहे. मात्र आता सदाभाऊ खोत मंत्री झाल्यामुळं त्यांचा पक्ष भाजप-शिवसेनेसह मोट बांधून मैदनात उतरण्याची शक्यता आहे. 


आष्टा नगरपालिका - 
आष्टा नगरपालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता आहे. त्यामुळं अन्य पक्षांची आघाडी झाली तर यंदा निवडणुकीत रंगत येण्याची शक्यता आहे. 


तासगाव नगरपालिका - 
तासगाव नगरपालिका अनेक वर्षे दिवंगत आर. आर. पाटलांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादीच्या ताब्यात होती. मात्र 2014 मध्ये संजय काका भाजपकडून खासदार झाल्यामुळं आता राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये सामना रंगण्याची चिन्ह आहेत. 


विटा नगरपालिका -
विटा नगरपालिकेत अनेक वर्ष काँग्रेसची सत्ता आहे. मात्र आता शिवसेनेचे अनिल बाबर आमदार झाल्यामुळं काँग्रेस विरूद्ध शिवसेना सामना रंगणार.  


पलूस नगरपालिका-
पलूस ही नव्यानं तयार करण्यात आलेली नगरपालिका आहे. ग्रामपंचायत असताना राष्ट्रवादीप्रणीत आघाडीची सत्ता होती. मात्र आता अमर इनामदार भाजपात गेल्यामुळं आता राष्ट्रवादी आणि भाजप आघाडीत निवडणूक रंगणार आहे. 


कडेगाव नगरपंचायत- 
कडेगाव नगरपंचायतीमध्ये काँग्रेसच्या पतंगराव कदम गटाचं वर्चस्व आहे. मात्र यंदा भाजप-राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये तिरंगी लढत रंगण्याची शक्यता आहे. 


कवठेमहांकाळ नगरपंचायत -
कवठेमहांकाळ नगरपंचायतीत भाजप खासदार संजयकाका पाटील आणि माजी मंत्री अजित घोरपडे यांच्यात सूर जुळल्यामुळं याठिकाणी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. 


खानापूर -
खानापूर ग्रामपंचायतीत काँग्रेसची सत्ता आहे. मात्र शिवसेना आमदार अनिल बाबर यांच्या वाढलेल्या वर्चस्वामुळं शिवसेना विरूद्ध काँग्रेसमध्ये सामना रंगण्याची चिन्ह आहेत. 


शिराळा नगरपंचायत -
सध्या शिराळा ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. सध्या या विधानसभा मतदार संघात भाजपाचे शिवाजीराव नाईक हे आमदार आहेत. मात्र नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकल्यामुळं निवड़णुकीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.