धुळे : धुळे जिल्ह्यात पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ न मिळता त्यांच्या डोळ्यात अश्रू आलेत. बळीराजाच्या आशा-आकांक्षांवर पाणी फिरलंय. शेतकऱ्याला विम्याची अद्याप एक दमडीही मिळालेली नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धुळे  जिल्ह्यातल्या ६२ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. शासनाची जोरदार जाहिरातबाजी आणि दुष्काळाच्या भीतीनं शेतकऱ्यांनी मोठ्या मुश्किलीनं पीक विमा काढला. खरीप हंगामात जे घडायचं नाही तेच घडलं. 


पावसानं दगा दिल्यानं ८० ते ९० दिवसाच्या पिकांचं प्रचंड नुकसान झालं. ज्यावेळी पावसाची पिकांना गरज होती त्यावेळी न बरसल्यानं हिरवी पिकं जमीनदोस्त झाली. 


विमा न काढणारे शेतकरी हवाल दिल झाले. विमा काढला असता तर काही लाभ मिळाला असता अशा विचारात असणारे शेतकरी आता मात्र विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांचं दुर्दैव पाहात आहेत. 


जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता त्यापैकी एकही शेतकऱ्याला नुकसान भरपाई म्हणून अद्याप एक नवा पैसाही कंपनीकडून मिळालेला नाही. 


मोठ्या अपेक्षेनं विमा काढला मात्र सरकारचा उद्देश विमाला प्रोत्साहन देण्यामागे रिलायन्स कंपनीचाच फायदा करण्याचा होता असा आरोप शेतकऱ्यांचा आहे.


मूग, बाजरी, मका पीक शेतातून काढून महिना उलटलाय तरी कृषी विभाग अजून पीक कापणी प्रयोगात मश्गुल आहे. सरकारच्या आणि कृषी विभागाच्या अनास्थेमुळे शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळत नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं केलाय. 


शेतकऱ्यांकडून पीक विमा काढून त्याचा लाभ न देता अक्षरशः त्यांची थट्टा केली जात आहे. ऐन दिवाळीत शेतकरी सरकारला आणि आपल्या नशिबाला कोसत बसलाय. वेळ गेल्यावर सरकारला जाग येईल मात्र तोपर्यंत काही उपयोग राहणार नाही.