धनंजय मुंडेंनी मागितली माफी
अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातील कोपर्डी बलात्कार प्रकरणी केलेल्या आरोपांवरून विरोधी पक्षनेते धनजंय मुंडेंनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातील कोपर्डी बलात्कार प्रकरणी केलेल्या आरोपांवरून विरोधी पक्षनेते धनजंय मुंडेंनी दिलगिरी व्यक्त केली आहे. बलात्कारप्रकरणातील आरोपीचा कॅबिनेट मंत्री राम शिंदेंबरोबर फोटो असल्याचा आरोप धनंजय मुंडेंनी केला होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र राम शिंदेंबरोबर असलेली व्यक्ती आरोपी नाही. आरोपी आणि फोटोमधली व्यक्ती यांची नावं सारखी आहेत, असं म्हंटलं होतं. तसंच विरोधकांनी माफी मागावी अशी मागणी केली होती.
मुख्यमंत्र्यांच्या या मागणीनंतर धनंजय मुंडेंनी दिलगिरी व्यक्त करणारं ट्विट केलं आहे. कोपर्डी प्रकरणातील आरोपीच्या सारख्या नावामुळे गोंधळ झाला म्हणून माफी मागावी असे वाटत असेल तर मी दिलगीरी व्यक्त करतो, असं धनंजय मुंडे म्हणाले आहेत.
दिलगिरी व्यक्त करत असतानाच धनंजय मुंडेंनी सरकारवर आणखी आरोप केले आहेत. राम शिंदेंवरील आरोपाच्या खुलाशासाठी मुख्यमंत्र्यांनी जेवढी तत्परता दाखवली ती तत्परता चार दिवसात घटनेबाबत का दाखवली नाही? असा सवाल मुंडेंनी विचारला आहे. तसंच Evidence अॅक्टनुसार आरोपींची ओळख परेड होण्याआधीच सरकारनं आरोपीचा फोटो जाहीर करून आरोपीसाठी डिफेन्स तयार केला नाही का ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.