धुळे : १५ ऑक्टोबर १९०० या दिवशी धुळे-चाळीसगाव ही पहिली रेल्वे धावली. या ११७ वर्षांच्या काळात या रेल्वेत केवळ एकच बदल झालाय तो म्हणजे कोळशाचे इंजिन ते डिझेल इंजिन हाच तो काय बदल...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झूक झूक आगीन गाडी... धुरांच्या रेषा हवेत सोडी... अशी आठवणींची सैर घडवत या 'खान्देश राणी'नं खान्देश वासियांच्या मनात एक हळवा कोपराही अधोरेखित केलाय. 


'गरीब रथ' म्हणूनदेखील ग्रामीण भागातील जनतेशी आपलेपणाचं नातं या रेल्वेने आजही कायम ठेवलंय. ५६ किलोमीटरच्या अंतरात ९ स्थानक आहेत. यात प्रामुख्यानं भोरस, जामदा, राजमाने, मोरदड तांडा, शिरुड, बोरविहिर, मोहाडी, धुळे असा ५६ किमीचा प्रवास ही रेल्वे करते.


मध्य रेल्वेच्या अखत्यारीत असलेल्या या रेल्वेनं धुळ्याला दुधाचा जिल्हा म्हणून ओळख दिली. धुळे जिल्ह्यातून मुंबईला दुधाच्या वाघिणीतून पुरवठा होत असे, आज ही पुनर्जिवणाच्या प्रतीक्षेत असलेल्या शासकीय दूध डेअरीपर्यंत रेल्वे रूळ असल्याचं पाहायला मिळेल. 


अवघ्या १५ रुपयात चाळीसगाव-धुळे हा प्रवास होतो. एसटीने याच मार्गानं जायचं असल्यास ६४ रुपये प्रवाशांना मोजावे लागतात. त्यातच एसटीने धुळे-औरंगाबाद बस सेवा बायपास विनावाहक केल्यानं चाळीसगाव बस स्थानकाकडे या एसटी बसेस येत नसल्यानं प्रवाशांना धुळे-चाळीसगाव या रेल्वेचा मोठा आधार आहे. शिवाय एसटी पेक्षा प्रवास भाडे कमी असल्यानं गरीब रथ म्हणून ही रेल्वे सेवा परिचित आहे.