डोंबिवली :  येथील औद्योगिक वसाहतीमध्ये मे महिन्यात झालेल्या प्रोबेस कंपनीतल्या स्फोटाच्या जखमा अजूनही भरलेल्या नाहीत. या स्फोटात जखमी झालेल्या रितेश मिश्रा या विद्यार्थ्याला आपला डोळा कायमचा गमावण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे सरकार दरबारी जखमी म्हणून दुर्गेश मिश्राची नोंदच नाही. त्यामुळे त्याच्या उपचारांचा खर्चही त्याला मिळालेला नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डोंबिवली एम आयडीसी मध्ये झालेल्या महाभयंकर स्फोटात, नवव्या इयत्तेतल्या रितेश मिश्रा याच्या एका डोळ्यात काचा, कचरा आणि बरेचसे कण गेले. तात्काळ त्याच्या डोळ्यावर पहिली शस्त्रक्रिया केली गेली. मात्र तरीही त्याला दिसत नव्हतं. म्हणून पुन्हा दुसरी शस्त्रक्रिया करण्यात आली. पण फरक काहीच फरक पडला नाही. नंतर त्याच्यावर तिसरी शस्त्रक्रिया झाली. तरीही रितेशच्या दुखापतग्रस्त डोळ्यात तसूभरही सुधारणा झाली नाही. 


स्फोटानंतर रितेशच्या डोळासोबतच, त्याची मान आणि डोकंही सतत दुखत असतं. स्फोटानं कमालीच्या धास्तावलेल्या रितेशला रात्री धड झोपही लागत नाही.  आजही थोड्याश्या मोठ्या आवाजानं तो दचकतो. रितेशच्या तीन शस्त्रक्रियांकरिता त्याच्या वडिलांनी नोकरीही सोडली. मात्र धक्कादायक बाब म्हणजे सरकार दरबारी जखमींच्या यादीत रितेशची नोंदच नाही. त्यामुळे मदतीचा एकही सरकारी पैसा त्याला अजूनपर्यंत मिळालेला नाही. 


डोंबिवली स्फोटातल्या सर्व जखमींच्या उपचारांची जबाबदारी घेतल्याचे सरकार सांगत असताना, नेमका रितेशच जखमींच्या यादीतून कसा वगळला गेला याची कारणं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शोधणार का? तसंच मुख्यमंत्री या प्रकरणात लक्ष घालून रितेश मिश्रा आणि त्याच्या पालकांना दिलासा देऊ शकतील का? आदी प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.