शहापूर : बँक खात्याची गोपनीय माहिती विचारुन ऑनलाईन फसवणुकीचा प्रकार शहापूरमध्ये घडलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विनोद सापळे यांना गुरुवारी एक फोन आला. या फोनवरील व्यक्तीने आपण 'स्टेट बँक ऑफ इंडिया'तून बोलत असल्याचे सांगितले. जुन्या एटीएम कार्डऐवजी नवे कार्ड पाहिजे असल्यास जुन्या कार्डवरील मागची-पुढची सगळ्या माहिती द्या, असं त्या व्यक्तीने सापळे यांना सांगितलं.


98 हजार गायब


नवीन एटीएमसाठी सापळे यांनी सगळी माहिती या व्यक्तीला दिली. मात्र, यानंतर काही वेळातच सापळे यांच्या बँक खात्यातून पैसे काढले जात असल्याचे मेसेजेस त्यांच्या मोबाईलवर येऊ लागले. त्यांच्या खात्यातून थोडे-थोडके नाही तर तब्बल 98 हजार रुपये काढून घेण्यात आले.


विशेष म्हणजे, विनोद सापळे यांचे कोणतेही पेटीएम किंवा ऑक्सिजन वॉलेट खाते नसताना ते सापळे यांच्या नावाने हे दोन्ही अकाउंट तयार करून हे पैसे काढण्यात आले. 


सापळे यांनी बहिणीच्या लग्नासाठी दीड लाख रुपये जमा केले होते. मात्र नोटबंदीच्या निर्णयानंतर त्यांनी सगळे पैसे बँकेत जमा केले. मात्र, अशिक्षितपणा आणि अज्ञानाचा फायदा घेऊन सापळे यांच्या खात्यावर डल्ला मारण्यात आलाय.


'झी 24 तास'चं आवाहन


याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. यामुळे आपल्या बँक खात्याची गोपनीय माहिती कुणालाही देऊ नका असं आवाहन आम्ही करतोय.