नितीन पाटणकर, पुणे : नाशिकनंतर पुण्यातही एका तोतया आयपीएस अधिकाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासोबत बॉडीगार्ड म्हणून वावरणाऱ्या सहा जणांनाही गजाआड करण्यात आलंय. या तोतयांनी एका व्यावसायिकाचे गुटखा विक्रीच्या संशयावरुन अपहरण करुन पाच लाख रुपयांची खंडणी मागितली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारती विद्यापीठ पोलिसांनी भास्कर विजय शिर्के या तोतया आयपीएस अधिकाऱ्याला अटक केलीय. लोकांना गंडा घातल्या प्रकरणी त्याच्यासह सहा लोकांना अटक करण्यात आली आहे. हे सहा जण शिर्के चे बॉडीगार्ड म्हणून वावरायचे. शिर्के हा स्वत: विशेष शाखेचा उपायुक्त असल्याचे भासवायचा... तो आणि त्याचे सहकारी भारत सरकार लिहिलेल्या दोन मोटारींमध्ये बसून लोकांकडून पैसे उकळण्याचे काम करीत असल्याची माहिती मिळाली होती.


त्यानुसार, नवले पुलाजवळ पोलिसांनी सापळा लावला... आणि दोन मोटारींमधून आलेल्या शिर्के वगळता अन्य सहा आरोपींना ताब्यात घेतलं, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय मदने यांनी दिलीय. 


आरोपींना पकडण्यात आले तेव्हा त्यांनी विशेष सरकारी अधिकारी असल्याचे पोलिसांनाही सांगितले. त्याच्याकडून पोलिसांनी साहित्य जप्त केले. त्यात त्याने आयपीएसची पाटी घरावर लावली होती. दोन चार चाकी गाड्याही पोलिसांनी जप्त केल्या आहेत.


पुणे शहरात अनेकजण कामा निमित्त येत असतात. त्यावेळेस असे भामटे त्यांना फसवण्याचे काम करतात. त्यामुळे पोलिसांनी आवाहन केलं आहे असा कोणी अधिकारी तुमची फसवणूक करत असेल तर पोलिसांना माहिती द्या.