पिंपरी : मुळातच प्रकृतीने श्रीमंत असणाऱ्या पिंपरी चिंचवड मधल्या रहिवाश्यांना महागड्या गाड्यांची हौस आहे हे तर सर्व श्रुतच आहे. पण केवळ महागडया गाड्या नाही तर गाडयांना फॅन्सी नंबर घेण्याची ही पिंपरी चिंचवडकराना मोठी हौस... म्हणूनच गेल्या चार दिवसात शहरात फॅन्सी नंबर साठी उप्रादेशिक परिवहन कार्यालयात नागरिकांनी तब्बल १ कोटी रुपये जमा केलेत...!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही गर्दी पाहिल्या नंतर तुम्हाला ही गर्दी नोट बदलण्यासाठी किंवा पैश्यासाठी असेल असं तुम्हाला वाटेल. पण थांबा ही गर्दी आहे गाडयांना फॅन्सी नंबर मिळवण्यासाठी...मुळातच श्रीमंत शहर म्हणून लौकिक असलेल्या पिंपरी चिंचवड मधल्या रहिवाश्यांची श्रीमंती ही वेळो वेळी दिसते. ती फॅन्सी नंबर मिळवण्याच्या दृष्टीने ही दिसली...! 


पिंपरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये आकर्षक क्रमांकाचे पैसे भरण्यासाठी ही भली मोठी रांग लागली होती. हौशी धनिकांनी या रांगेत उभे राहून आकर्षक क्रमांकासाठी लाखो रुपये भरले. वाहनासाठी १ क्रमांक मिळावा यासाठी एका हौशी वाहन मालकाने तब्बल चार लाख रुपयांची बोलीही या वेळी लावली. पाचशे आणि एक हजाराच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय झाल्यानंतर सामान्य नागरिक बेचैन झाला आहे. या निर्णयाच्या १५ दिवसांनंतरही पैसे काढण्यासाठी आणि जुन्या नोटा बदलण्यासाठी एटीएम केंद्रांच्या आणि बँकांच्या बाहेर नागरिकांच्या रांगा लागल्याचे चित्र आहे. पण पिंपरी आरटीओ कार्यालयामध्ये ‘फॅन्सी नंबर’ची हौस भागवणाऱ्या तसेच प्रतिष्ठेसाठी आकर्षक क्रमांक घेणाऱ्यांच्या रांगा गेल्या चार दिवसांपासून आहेत. 


आकर्षक क्रमांकाचे पैसे धनाकर्षांद्वारे डीडीद्वारे भरण्याची सक्ती असते. त्यानुसार हजारो, लाखो रुपये डीडीद्वारे भरले जात होते. आरटीओ कार्यालयात सोमवारीएका दिवसात ४३० वाहन मालकांनी आकर्षक क्रमांकासाठी तब्बल ५७ लाख सहा हजार रुपयांचा भरणा केला. तर मंगळवारी दिवसभरामध्ये ३५० वाहन मालकांनी आकर्षक क्रमांकासाठी १४ लाख ७५ हजार रुपये डीडीद्वारे भरले, बुधवारी आणि गुरुवारी ही जवळ पास २० लाख रुपये भरण्यात आले...


एकूणच काय तर फक्त आलिशान गाडी नाही तर तिचा नंबर ही आलिशान हवा, मग किंमत किती ही लागली तरी चालेल...!