शेतकरी दादाला, पोटभर जेवण फक्त १ रुपयात
शेतकऱ्यांसाठी फक्त एक रुपयात पोटभर जेवण देणारी ब्रह्मपूर्ण योजना सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने गुरुवारपासून सुरू करण्यात आली.
सोलापूर : शेतकऱ्यांसाठी फक्त एक रुपयात पोटभर जेवण देणारी ब्रह्मपूर्ण योजना सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने गुरुवारपासून सुरू करण्यात आली.
कोणाची आहे ही संकल्पना...
या योजनेमुळे रोज शेकडो शेतकऱ्यांच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था झाली आहे. बाजार समितीचे सभापती माजी आमदार दिलीप माने यांच्या संकल्पनेतून ही योजना साकारली आहे.
बाजार समितीची उलाढाल किती...
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची उलाढाल सुमारे ९५० कोटी रुपये असून रोज बाजार समितीमध्ये शेतीमाल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या पाच हजारांवर आहे. येथील बाजार समितीचा राज्यभरात दुसरा क्रमांक लागतो. महाराष्ट्रासह आंध्र आणि कर्नाटकातील शेतकरी येथे शेतीमाल विक्रीसाठी येतात.
किती दिवस राहतात शेतकरी...
या शेतकऱ्यांना किमान दोन दिवस तरी बाजार समितीमध्ये राहावे लागते. त्यांच्या राहण्याची सोय बाजार समितीत आहे, मात्र, जेवणासाठी बाहेरच्या हॉटेलांवरच अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे एक वेळचे जेवण घेण्यासाठीही किमान ५० ते ६० रुपये मोजावे लागतात. काही शेतकरी दोन ते तीन दिवसासाठी लागणाऱ्या भाकरी बांधून घेऊन येतात, परंतु त्यांना भाजीसाठी किमान २५ ते ३० रुपये मोजावे लागतातच.
महत्त्वाची योजना...
सभापती माने यांनी बाजार समितीचा कारभार हातात घेतल्यानंतर अनेक योजना राबविल्या. त्यापैकीच एक महत्त्वाची योजना म्हणून शेतकऱ्यांसाठी एक रुपयात जेवणाच्या ब्रह्मपूर्ण योजनेकडे पाहिले जात आहे.
किती रूपयांचे जेवण १ रुपयात दिले जाते...
ही योजना शेतकऱ्यांसाठी असली तरी बाजार समिती आणि अडत व्यापारी यांचे त्यात मोठे योगदान असेल. एका ताटासाठी ३० रुपये खर्च येणार आहे. त्यापैकी वीस रुपये बाजार समिती आणि दहा रुपये अडते देणार आहेत. शेतकऱ्यांकडून नाममात्र एक रुपया घेतला जाणार आहे. जेवणात तीन चपात्या, दोन भाज्या, कोशिंबीर आणि भात यांचा समावेश असेल.