लातूर :  सरकारच्या आश्वासनानंतरही तूर खरेदी झालेलीच नाही. सरकारकडून आदेश नसल्याने तूर खरेदी रखडली आहे. खरेदी केंद्रांसमोर शेतकरी अजूनही रांगेतच उभा आहे. तूर उत्पादक शेतक-यांना सरकार दिलासा देणार का, असा प्रश्न उपस्थित करुन ४ दिवसांपासून शेतकरी तूर विक्रीसाठी ताटकळत ठेवल्याने संताप व्यक्त होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्य सरकारनं २२ एप्रिलपर्यंतची तूर खरेदी करण्याचा निर्णय घेतला असला तरी लातूर जिल्ह्यातील ९ पैकी एकाही केंद्रावर तूर खरेदी झालेली नाही. जिल्ह्यात महाराष्ट्र फेडरेशनचे ८ आणि विदर्भ मार्केटिंग फेडरेशनचे १ खरेदी केंद्र आहेत. त्यापैकी उदगीर, शिरुर अनंतपाळ आणि मुरुड येथील तूर खरेदी केंद्र ही आवक नसल्यामुळे बंद झाली आहेत.


तर उर्वरित लातूर, अहमदपूर, चाकूर, जळकोट, रेणापूर आणि औसा केंद्रावर २२ एप्रिलपर्यंत जवळपास ४ हजार शेतकऱ्यांनी तूर खरेदीचे टोकण घेतले आहे. ज्यात रेणापूर ३१००, चाकूर ५०००, अहमदपूर २५०००, जळकोट ६०००, औसा २२००० तर लातूरच्या तूर खरेदी केंद्रावर १५० क्विंटल अशी एकूण ६१ हजार १५० क्विंटल तूर खरेदी केली जाणार आहे. 


अद्यापपर्यंत शासनाचे कसलेच आदेश प्राप्त न झाल्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत तूर खरेदी केली जाणार नसल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.