नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे : पुण्यातील कचरा प्रश्न २२ दिवसांनंतरही सुटलेला नाही. महापालिका आणि राज्यातील सत्त्ताधारी भाजपचं या प्रश्नाकडील दुर्लक्ष याला कारणीभूत आहे. तसंच, या प्रश्नामागे राजकीय आणि प्रशासकीय बाजू देखील आहे. पाहुयात एक रिपोर्ट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


फुरसुंगी येथील आंदोलक ग्रामस्थांना सुप्रिया सुळे यांनी दोनदा भेट दिलीय. दोन्ही वेळेस त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे माजी चार ते पाच महापौर होते. आतापर्यंत राष्ट्रवादीचे नेते या आंदोलनाला भेट देत ते ग्रामस्थांनी आंदोलन मागे घ्यावे ही विनंती करण्यासाठी. पण आज राष्ट्रवादीचे हे नेते या आंदोलनाला पाठिंबा द्यायला जात आहेत. राष्ट्रवादीची बदलेली ही भूमिका पुण्यातील कचरा प्रश्न पेटवत ठेवण्यास पूरक ठरत आहे. पण राष्ट्रवादीच्या नेत्यांना हे मान्य नाही. 



राष्ट्रवादीप्रमाणे शिवसेनेची या आंदोलनात कळीची भूमिका आहे. कारण, फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावांवर राष्ट्रवादीनंतर शिवसेनेचा प्रभाव आहे. तिथले स्थानिक आमदार ही शिवसेनेचे राज्यमंत्री विजय शिवतारे आहेत. आतापर्यंत झालेल्या आंदोलनात शिवतारे यांनी महत्वाची भूमिका पार पाडलीय. वेळ पडल्यास आंदोलन थांबवण्यात यशस्वी मध्यस्थी केलीय. पण यावेळी तेही गायब आहेत. मतदार संघातील ग्रामस्थ आंदोलन करत असताना, आणि पुण्यात कचरा साठलेला असताना राज्याचे मंत्री असलेले विजय शिवतारे कुठे आहेत. असाही प्रश्न पुढं येतोय. समोर आले नसले तरी, शिवतारे पडद्यामागून महत्वाची भूमिका निभावत तर नाहीत ना.. अशी शंका देखील त्यामुळे घेतली जातेय. 


  
त्यात महापालिका प्रशासनाची वेगळीच भूमिका आहे. पुण्यात दररोज साधारण १७०० टॅन कचरा निर्माण होतो. पण , त्यातील फक्त ६०० ते ७०० टन कचऱ्याचा प्रश्न आहे. त्यातही साधारण ४०० टन कचरा उरुळी, फुरसुंगी, हांडेवाडी , येवलेवाडी आदी आजूबाजूच्या गावातील आहे. ही गावं महापालिका हद्दीबाहेरील आहेत. तरीही  महापालिका इथला कचरा उचलते. त्यामुळे हा कचरा तरी डेपोत टाकू दिला जावा असं प्रशासनाचं म्हणणं आहे. 



पुण्यातील कचरा प्रश्नाला अशी विविध अंगं असली तरी सध्या हा प्रश्न चिघळलाय त्याला भाजपने या प्रश्नाकडे केलेलं दुर्लक्ष अधिक कारणीभूत दिसतंय. पुण्यात जागोजागी कचरा साठलेला असताना, महापौर आणि पालकमंत्री  परदेश दौऱ्यावर जाणे खचितच योग्य नव्हतं.