`त्या` मुलीवरच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी आमदार लांडगेंनी स्वीकारली
मुलगी म्हणून जन्मदात्यांनी नाकारली. जन्मानंतर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाल्यावर त्या बाळाचा मृतदेहही जन्मदात्यांनी नाकारला. अंत्यसंस्कार कोण करणार असा प्रश्न उभा राहिला. मात्र, आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला.
पुणे : मुलगी म्हणून जन्मदात्यांनी नाकारली. जन्मानंतर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाल्यावर त्या बाळाचा मृतदेहही जन्मदात्यांनी नाकारला. अंत्यसंस्कार कोण करणार असा प्रश्न उभा राहिला. मात्र, आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला.
पिंपरी चिंचवडमधल्या त्या अभागी बाळाची ही हृदयद्रावक कहाणी झी २४ तासने मांडल्यावर अखेर त्या मुलीवर अंत्यसंस्काराची जबाबदारी आमदार महेश लांडगे यांनी घेतलीय. पिंपरी चिंचवडमधल्या वायसीएम या रूग्णालयात जन्म झालेल्या त्या बाळावर श्वसनाच्या त्रासामुळे उपचार सुरू होते. पण उपचारादरम्यान त्या बाळाचा अंत झाला. मात्र केवळ मुलगी म्हणून नाकारणाऱ्या तिच्या नराधम जन्मदात्यांनी तिला मृत्यूनंतरही नाकारले. त्यामुळे तिच्यावर अंत्यसंस्कार कोण करणार असा प्रश्न निर्माण झाला होता.
झी २४ तासवर हे वृत्त प्रसारीत झाल्यावर महेश लांडगे यांनी त्या बाळावर विधीवत अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी घेतलीय. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या असल्या दाम्पत्याला समाज कधीही माफ करणार नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.