अहमदनगर : कोपर्डी गावात अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कारानंतर अन्य मुलींमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोपर्डी गावातल्या अमानुष घटनेनं अख्खा महाराष्ट्र सुन्न झालाय. अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून, तिचा अमानुष छळ करून निर्घृण खून करण्यात आला. वासनांध नराधमांच्या या पाशवी अत्याचारानंतर इतर मुलींमध्येही घबराट पसरली आहे. 


गेल्या दोन दिवसांपासून तिथल्या शाळा बंद होत्या. तिस-या दिवशी शाळा उघडल्या तेव्हा केवळ 30 टक्के मुलीच हजर होत्या. या पार्श्वभूमीवर कर्जतमध्ये 9 शाळांच्या विद्यार्थिनींनी मंगळवारी निषेध रॅली काढली. या नराधमांना कठोर शिक्षा व्हावी आणि मुलींना संरक्षण मिळावं, अशी मागणी त्यांनी केली आहे. 


विद्यार्थिनींच्या मनातली भीती दूर करण्यासाठी आणि त्यांना संरक्षण देण्यासाठी आता शिवसेना पुढं सरसावली आहे. कोपर्डीतल्या अमानुष अत्याचाराचे पडसाद संसदेतही उमटले. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी लोकसभेत, तर काँग्रेस खासदार रजनी पाटील यांनी राज्यसभेत याप्रकरणी आवाज उठवला.


कोपर्डीतल्या बलात्कार आणि खुनाच्या घटनेनंतर मुलींमध्ये निर्माण झालेली भीती सर्वांनी मिळून दूर केली पाहिजे. समाजानं त्यासाठी पुढाकार घ्यायला हवाच. पण कायद्याचा धाक वाटेल, अशी पावलं पोलीस आणि सरकारनं उचलण्याची गरज आहे.