रत्नागिरी : पावसाने कोकणातील उत्तर रत्नागिरीमध्ये धुमाकूळ घातलाय. खेड आणि चिपळूण तालुक्याला पावसाने जोरदार झोडपून काढलं आहे.  खेड येथील नारंगी, चोरद, जगबुडी या नद्यांना मोठा पूर आलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चोरद नदीला पूर आल्याने 32 गावांचा संपर्क तुटला आहे. खेड येथील बिजघर पुलावरुन एक युवक वाहून गेलाय. नारंगी नदीला पुर आल्यामुळे दापोली ते खेड या मार्गावरील वाहतूकही पावसामुळे ठप्प झाली आहे. खेड परिसरात मुसळधार पावसाने शहराच्या बाजारपेठांमध्ये पुराचं पाणी घुसलं आहे. 


मुंबई-गोवा महामार्गावरील जगबुडी नदीला आलेल्या पुरामुळे महामार्गावरची वाहतूक वळवण्यात आली आहे. तसेच चिपळूणच्या वाशिष्टी नदीला देखील पूर आलाय. मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारी वाहतूक खेड येथे अडवण्यात आलीय तर गोव्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक चिपळूणच्या बाहदूरशेख नाक्यात अडवण्यात आलीये. 


एसटीने आपल्या सर्व गाड्या चिपळूणच्या शिवाजीनगर स्थानकात उभ्या करून ठेवल्या आहेत. पुढील आदेश येईपर्यंत वाहतूक सुरू केली जाणार नसल्याची माहिती वाहतूक निंयत्रकांनी दिली आहे.