नांदेड : जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मराठवाड्यात आतापर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद नांदेड जिल्ह्यात झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुधवारी नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर, भोकर, हदगाव आणि अर्धापूर तालुक्यात मुसळधार पाऊस झाला.. गेल्या आठ दिवसांपासून नांदेड जिल्ह्यातील विविध तालुक्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस बरसत आहे. बुधवारी झालेल्या पावसामुळे अनेक छोट्या मोठ्या नदी नाल्यांना पूर आला.


हिमायतनगर - भोकर रस्त्यावरील हरडप येथील पुलावरुन पाणी वाहू लागल्याने भोकर किनवट हा मुख्य मार्ग बंद झाला होता. वाहनाच्या मोठ्या रांगा या रस्त्यावर लागल्या होत्या. सरसम येथील नाल्यावरुनही पाणी वाहू लागल्याने गावाचा संपर्क तुटला होता.


हदगाव तालुक्यातही मुसळधार पाऊस झाला. हदगाव तालुक्यातील हरडप येथील पुलवरुनही नाल्याचे पाणि वाहू लागल्याने काही गावांचा संपर्क तुटला होता. अर्धापूर तालुक्यातही तीन तास मोठा पाऊस झाला. या पावसाने नदी नाल्यांना पूर तर आलाच शिवाय अनेक शेतात पावसाचे पाणी साचले होते.


नांदेड शहरातही दिवसभर संततधार पाऊस सुरू होता. मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. बुधवारी सकाळ पर्यंत नांदेड जिल्ह्यात १७४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर बुधवारी दिवसभर झालेल्या पावसाने सरासरी पावसात आणखी भर पडणार आहे. जिल्ह्यात चांगला पाऊस होत असल्याने समाधान व्यक्त होत आहे.