मुंबई : पश्चिम महाराष्ट्राबरोबरच मराठवाड्यातल्या लातूर जिल्ह्यात मेघ गर्जनेसह अवकाळी पाऊस झाला आहे. या पावसामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांची धावाधाव झाली आहे. केंद्रावर तूर झाकण्यासाठी पळापळ झाली. या तुरीचं नुकसान झालं तर जबाबदार कोण असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. मराठवाड्यातल्या या अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हवामान खात्यानं मध्य महाराष्ट्र आणि कोकणात अवकाळी पावसाचा इशारा दिलाय. येत्या 24 तासांत कोकणात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीये. तर मध्य महाराष्ट्रात येत्या 48 तासांत  गारपिटीसह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. त्यामुळे या भागातील शेतक-यांनी खबरदारी घ्यावी अशा इशारा हवामान खात्यानं दिलाय.


सांगली जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपीट झालीय. कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटनांद्रे परिसरात गारांसह जोरदार पाऊस झाला. तासगाव तालुक्यातील सावळज, सिद्धेवाडी, अंजनी, डोंगरसोनी, दहिवडी, गव्हाण, वज्रचौंडे या गावात गारांचा पाऊस झाला.


कवठेमहंकाळ तालुक्यातील घाटनांद्रे, तिसंगी, कुंडलापुर, कुच्ची या गावात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय. हा अवकाळी पाऊस द्राक्ष आणि अन्य शेती पिकांना नुकसान देणारा ठरणार आहे.


गारपीट आणि पावसामुळे खरड छाटणी नंतरच्या द्राक्ष बागांच्या कोवळ्या फुटी मोडल्याने द्राक्षबागा उद्धवस्त होण्याची भीती व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसापासून सांगली जिल्ह्यात ४० अंश से. तापमान आहे. मात्र या  पावसामुळे दुष्काळी कवठेमहंकाळ आणि तासगाव तालुक्यात गारवा निर्माण झाला असला तरी, हा पाऊस शेतीसाठी नुकसान करणारा आहे.