रायगडहून प्रफुल्ल पवारसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल होणा-या चाकरमान्यांचा प्रवास निर्विघ्नपणे होण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर 1 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर पर्यंत अवजड वाहनांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हय़ात 1 हजार 333 पोलीस अधिकारी व कर्मचा-यांचा फौजफाटा तैनात असेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 कोकणात गणेशोत्सव सर्वात मोठा आणि महत्वाचा उत्सव मानला जातो. त्यासाठी बाहेरगावी असलेले चाकरमानी गावाकडे उत्सवासाठी दाखल होतात. या काळात मुंबई-गोवा महामार्ग वाहनांच्या गर्दीने गजबजून जातो. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज आहे. कशेडी पाँईट, खेड ते राजापूर जकातनाका दरम्यानच्या मार्गावर प्रशासनाची वाहतूकीवर नजर असेल.  



कोकणात जाणा-या गणेशभक्तांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी पर्यायी मार्ग सुचवण्यात आलेत. 



- पर्याय क्रमांक एक - मुंबई-गोवा महामार्गाचा वापर गणेशभक्त करु शकतात.त्याचप्रमाणे मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गे मुंबई, खालापूर, पाली फाटा, वाकण, महाडमार्गेही जाता येईल. 
- तसंच सातारा, कराड, कोल्हापूर, मलकापूर, आंबाघाटमार्गे रत्नागिरी गाठता येईल. सातारा, कराड, कोल्हापूर, गगनबावडामार्गे कणकवलीपर्यंत गणेशभक्त पोहचू शकतात. सातारा, कराड, कोल्हापूर, आंबोलीमार्गे सावंतवाडीपर्यंत पोहचण्यातही मदत होऊ शकणार आहे. 


तसंच दूर्दैवी घटनांमध्ये जखमींना त्वरीत वैद्यकीय उपचार मिळण्य़ासाठी महामार्गावर खाजगी रुग्णवाहिका आणि वैद्यकीय पथक नेमण्यात येईल. 


रत्नागिरी जिल्ह्य़ातील महत्त्वाच्या आणि गर्दीच्या रेल्वेस्थानकापासून प्रवाशांची वाहतूक एस.टी.बसेसच्या गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. मुळात खड्यानी चाळण झालेल्या  आणि रुंदीकरणाच्या कामामुळे अरुंद झालेल्या रस्त्यामुळे  मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूकही ही नेहमीच मंदावलेली असते. गणेशोत्सव काळात वाढणा-या वाहतूकीवर सार्वजनिक बांधकाम खाते, पोलीस, एसटी विभाग या सगळ्यांसह जीव मुठीत धरुन जाणा-या चाकरमान्यांचीही परीक्षाच असणार आहे.