ही महिला 99 वर्षाची महिला नाही...तर तरूणी
आयुष्याचा पूर्णपणे आनंद घेण्यासाठी अजूनही शिवणकामासारखे छंद जोपासायला आवडत असल्याचं त्या सांगतात.
पुणे : 99 वर्षांच्या वृद्ध महिलेवर हीप रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया करण्यात पुण्यातील डॉक्टर्सना यश आलंय. मुंबईतील शालिनी चिरपूटकर यांच्यावर साईश्री हॉस्पिटलमध्ये ही शनिवारी ही शस्त्रक्रिया करण्यात आली.
वृद्धापकाळ म्हणजे आयुष्याची संध्याकाळ असं मानलं जातं. मात्र आयुष्याच्या संध्याकाळीही जगण्याची उमेद असलेल्या या शालिनी चिरपूटकर...
वय वर्षे फक्त 99... ! मात्र त्यांच्यावर नुकतीच हिप रिप्लेसमेंट सर्जरी करण्यात आली यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. या वयातही इतक्या मोठ्या सर्जरीला सामोरं जाऊनही त्यांचा आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन जगण्याची इच्छाशक्ती चकीत करणारी.
आयुष्याचा पूर्णपणे आनंद घेण्यासाठी अजूनही शिवणकामासारखे छंद जोपासायला आवडत असल्याचं त्या सांगतात.
ऑक्टोबरमध्ये चिरपूटकर आजींना अपघातामध्ये खुब्याच्या सांध्याला दुखापत झाली. त्यावेळी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली खरी पण हाडं ठिसूळ झाल्याने ही शस्त्रक्रिया अयशस्वी ठरली. त्यामुळे हिप ट्रान्सप्लांटचा निर्णय घेण्यात आला. या वयातही त्या या खडतर सर्जरीला सहज सामोऱ्या गेल्या.
99 वर्षांच्या आयुष्यात चिरपूटकर आजींनी नियमीत व्यायाम, समाजकार्य आणि स्वावलंबन या तीन बाबी कसोशीने पाळल्या. 96 वर्षांच्या होईपर्यंत त्यांनी अनेकदा मुंबई मॅरेथॉनमध्येही सहभाग नोंदवला. त्यांच्या या सक्रियेतेमुळेच त्या शस्त्रक्रियेनंतरही निरोगी आयुष्य जगतील असा नातेवाईकांना विश्वास आहे.
जुनं ते सोनं ही म्हण आपण अनेकदा ऐकतो... चिरपूटकर आजींच्या बाबतीत ती तंतोतंत लागू पडते.. शंभरी गाठताना आजींच्या जगण्यातला उत्साह आणि जिद्द तरूणांना बरच काही शिकवून जाणारी आहे.