जालना : येथे बारावीच्या उत्तरपत्रिकांमध्ये गुणवाढ केल्याप्रकरणी औरंगाबाद बोर्डामधील सहा लिपिकांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले असून प्राचार्यही अटकेत आहेत. १८ मार्चला हजारो पुनर्लिखित उत्तरपत्रिका जप्त करण्यात आल्या होत्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बारावीच्या उत्तरपत्रिकांचं पुनर्लेखन करून गुणवाढ करणाऱ्या रॅकेटची पाळंमुळं औरंगाबाद बोर्डातही असल्याचं समोर आलंय. जालना पोलिसांनी औरंगाबाद बोर्डातून एकूण सहा लिपिकांना ताब्यात घेतलंय. योगेश पालेपवाड, रमेश गायकवाड, दीपक शिंदे आणि अशोक नंद, डी. ब्रम्हपुरकर आणि पी. देऊळगावकर अशी त्यांची नावं असून ते बोर्डातील गोपनीय शाखेत कार्यरत आहेत. 



तर जालन्यातील वाटूर येथील महंत रामगिरीबाबा कॉलेजचा प्राचार्य संजय शिंदेलाही अटक झालीये. जालन्यातल्या संस्कार निवासी वसतिगृहावर पोलिसांनी १८ मार्च रोजी रात्री छापा टाकून अडीच हजार पुनर्लिखित उत्तरपत्रिका आणि तब्बल ५ हजार को-या उत्तरपत्रिका जप्त केल्या होत्या. या प्रकरणी वसतिगृहाचा चालक श्रीमंत वाघसह अंकुश पालवे, सुदीप राठोड, गजानन टकले, अमोल शिंदे आणि प्रा. शिवनारायण कायंदे यांना आतापर्यंत अटक करण्यात आलीय. 


याशिवाय या रॅकेटमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या पिशोरच्या सद्गुरु योगीराज दयानंद महाराज महाविद्यालय, बाजारसावंगी इथल्या दयानंद महाविद्यालय आणि जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यातल्या राणीउंचेगावचे इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सहभागाचे पुरावे पोलिसांनी शिक्षण उपसंचालकांकडे दिल्याचंही सांगण्यात येतंय.