राहुल ढवळे, बारामती : इंदापूरच्या वाणेवाडी-लक्ष्मीनगर या छोट्या वस्तीत राहणा-या शेखर नामदास या तरुणानं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं मंत्रालय सहाय्यक वर्ग दोन पदासाठी घेतलेल्या परीक्षेत अनुसूचित जाती प्रवर्गातून राज्यात पहिला आलाय. पाहूयात त्याच्या यशाची कहाणी...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्नाच्या वरातीतल्या बँड पथकात ज्या तन्मयतेनं तो ढोल-ताशा वाजवतो, त्याचं जिद्दीनं त्यानं आपल्या उज्ज्वल भविष्याची स्वप्नंही रंगवलीयत... ती स्वप्नं पूर्ण करण्यासाठी जीवापाड मेहनत घेतलीय. आणि त्या मेहनतीचं फळ त्याला मिळालंय... शेखर नामदास नावाच्या या बँड बाजा वाजवणाऱ्या अवलियानं एमपीएससी परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवलंय. अनुसूचित जाती प्रवर्गातून राज्यातून पहिला येण्याचा बहुमान पटकावलाय. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीवर मात करत शेखरनं ही उत्तुंग भरारी घेतलीय...


बारामतीतल्या वाणेवाडी-लक्ष्मीनगर या छोट्या वस्तीत शेखर राहतो. त्याच्या कुटुंबाकडे एक गुंठाही जमीन नाही. वडील ट्रॅक्टर चालक तर आई शेतमजुरी करते...ग्रामपंचायतीकडून मिळालेल्या घरकुलात राहून त्यानं शेजारच्या न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात शिक्षण घेतलं. 


जितक्या तन्मयतेनं त्याची काठी ताशावर चालते तितक्याच तन्मयतेनं शेखरचं पेनही कागदावर चालतं. सुरुवातीला हातात काठीही न धरता येणारा शेखर नंतर मात्र पट्टीचा ताशा वादक झाला. त्याच्या या यशानं बँडमधले त्याचे सहकारीही भारावून गेलेत.


थोड्या अपयशानं खचून जाणा-या विद्यार्थ्यांसाठी शेखरच्या उदाहरणावरून नक्कीच प्रेरणा मिळेल...कारण शेखरला दहावीला केवळ ५० टक्के, बारावीला ६० टक्के तर वाणिज्य शाखेच्या पदवी परीक्षेत ६४ टक्के गुण मिळाले होते. २०१२ नंतर त्यानं स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला आणि यशाचं शिखर गाठलं. जिद्द, चिकाटी आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर गरिबीवर मात करून, यशाची उत्तुंग भरारी घेता येते हेच शेखरनं दाखवून दिलंय. भावी आयुष्यासाठी त्याला झी 24 तासच्या खूप खूप शुभेच्छा...