बेकायदेशीर गर्भलिंगनिदानाचा प्रकार उघड; आरोपी फरार
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात एक धक्कादायक बातमी उघडकीस आलीय. पिराचीवाडी या डोंगराळ गावात बेकायदेशिर गर्भलिंग निदान केलं जात असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात एक धक्कादायक बातमी उघडकीस आलीय. पिराचीवाडी या डोंगराळ गावात बेकायदेशिर गर्भलिंग निदान केलं जात असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे.
रात्री उशिरा छत्रपती प्रमीलाराजे रुग्णालयाच्या गर्भलिंग निदान विरोधी पथकानं धाड टाकल्यानंतर ही बाब समोर आलीय. छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय आणि कागल पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली.
पण बेकायदेशिर गर्भलिंग निदान करणारा मुख्य आरोपी पिंटू रोढे अंधाराचा फायदा घेत सोनोग्राफी मशीनसह पळून गेला. या पथकानं कागल पोलिसांच्या मदतीनं दोन डमी पेशंटना गर्भलिंग निदान करण्यासाठी पाठविलं होतं... आणि शहानिशा करुन पिंटू रोढेच्या घरावर धाड टाकली.
दरम्या, या कारवाईची कुणकुण लागताच पिंटू रोढेनं आंधाराचा फायदा घेऊन घराच्या मागच्या दरवाज्यातून मशीनसह पळ काढला. पोलिसांनी घरात तपास केला असता सोनोग्राफी करण्यासाठी लागणारे साहित्य, औषध आणि ग्राहकांकडून घेतलेले पैसे सापडले.
पोलिसांनी हे साहित्य जप्त करुन पिंटू रोढेला मदत करणाऱ्या एक महिलेला आणि सोनोग्राफी करुन घेण्यासाठी आलेल्या काही महिलांच्या नातेवाईकांना ताब्यात घेतलंय.
दरम्यान रोढे याच्या घरात सोनोग्राफी केलेल्या अनेक महिलांच्या नावांची रिसीट आढळून आलीय. धक्कादायक बाब म्हणजे सोनोग्राफी करणारा पिंटू किंवा ताब्यात घेतलेल्या महिलेला कोणतच वैद्यकीय ज्ञान नसल्याची बाब समोर आलीय. तरीदेखील दहा ते पंचवीस हजार रुपये देऊन अनेकांनी बेकायदेशीर गर्भलिंग निदान करुन घेतल्याचं उघड झालंय.