कैलास पुरी, पिंपरी चिंचवड : यशस्वी व्हायचं असेल तर मनातली भीती घालवावी लागते. अगदी आपण कसं प्रेझेंट व्हायचं, कसे कपडे घालायचे याचा विचार करावा लागतो. पुण्यातली नॅन्सी कटियाल तुम्हाला हेचं शिकवते. तिनं आतापर्यंत १० लाख व्यक्तींच्या आयुष्याला वळण दिलंय. यासाठी तिला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय. पाहुयात काय आहे नॅन्सीची कहाणी... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही पुण्याच्या बालेवाडी परिसरात राहणारी नॅन्सी कटियाल... मुक्त उधळण झालेलं तीच सौंदर्य पाहिल्यावर तुम्हाला एखाद्या हिरॉईनची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. पण तिचे काम एखाद्या हिरॉईनला शोभेल असंच आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक सकारात्मक बदल नॅन्सी तुमच्यात सहज घडवते. नॅन्सी एक एन्टरप्रुनर आहे. 'द परफेक्ट यू'च्या माध्यमातून इमेज कन्सल्टंट, सॉफ्ट स्किल कोच आणि स्टोरीटेलर अशा तिहेरी भूमिका ती सहज पार पाडते.


स्टोरीटेलर नॅन्सी!


नॅन्सीने आत्तापर्यंत अनेक नामांकित कॉर्पोरेट कंपन्यांसह तब्बल ५०० कंपन्यांमधल्या कर्मचाऱ्यांना, कॉलेजच्या, एनजीओ अशा तब्बल १० लाख व्यक्तींच्या आयुष्याला स्पर्श केलाय. नॅन्सी स्टोरीटेलर आहे? म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तुम्हाला वाटतं तसं ती काही गोष्टी सांगत नाही, ती तुम्हाला यशस्वी व्हायचं कसं याचा मंत्र यशस्वी लोकांच्या अद्भुत कथा सांगून करते आणि फक्त कथा सांगून ती थांबते असे नाही, तर ती तुमच्या व्यक्तीमत्वातच आमुलाग्र बदल घडवते. कपडे कसे घालायचे, बोलायचं कसं हे सर्वच बदल ती तुमच्यात घडवते, म्हणूनच देशातल्या पहिल्या १२ इमेज कंसल्टंट मध्ये तिचं नावं आहे. पण तिचा हा थक्क करणारा प्रवास काही सोपा नव्हता. अनेकांनी तीला तुला जमेल का असा प्रश्न उपस्थित केला पण तीने निर्णय घेतला आणि वास्तवात आणलाही....!


इमेज कन्सल्टंट, स्टोरीटेलर म्हणून देशात नॅन्सीचं नाव आघाडवर घेतलं जातं. पण नॅन्सीला हे यश मिळत असताना तिच्या जवळच्या लोकांना ते आवडलं नाही याचं तीला प्रचंड दु:ख ही झालं. पण त्यातूनच आपलं कोण परकं कोण हे ही समजल्याचं ती सांगते.  


'लिम्का'नंही घेतली नोंद


नॅन्सी फक्त व्यावसायिक उद्देशानेच काम करते असं नाही. तिने समाजातल्या आर्थिक दुर्बल घटकातल्या शिक्षण घेतलेल्या पण आत्मविश्वास नसलेल्या तरुण तरुणींनाही मार्गदर्शन केलंय. तीच्या या प्रयत्नांची रेक्सकडून दखल घेण्यात आलीय. तिला 'रेक्स कर्मवीर पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आले. एवढंच नाही तर नॅन्सी आणि तीच्या सहकाऱ्यांच्या नावावर 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स'ही आहे. नॅन्सी आणि तिच्या साथीदारांनी ११ तारखेला ११ वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी ट्रेनिंग सेशन घेत लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नावं कोरलं.


एक यशस्वी बिजनेस वूमन असतानाही नॅन्सी कौटुंबिक जबाबदाऱ्याही लीलया पेलतेय. मुलीचा अभ्यास, घरातली कामं सहज करत आज ती इथपर्यंत पोहचलीय.  नॅन्सी ने विकिपीडिया, टोस्टमास्टर्स, या सारख्या प्लॅटफॉर्म वरही आपले विचार मांडलेत. तिची ही झेप नक्कीच अनेकांना प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही.