जालना : जिल्ह्यात चार नगरपालिकांच्या निवडणुका पार पडतायेत सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुका प्रतिष्ठेच्या केल्या असून जालना पालिका ताब्यात घेण्यासाठी काँग्रेस शिवसेनेत जोरदार घमासान होण्याची चिन्ह आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या 5 वर्षांपासून आघाडीच्या ताब्यात असलेली जालना नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केलीय. सध्या जालना पालिकेतील संख्याबळ 54 असून त्यात जालना नगरपालिकेत 54 नगरसेवक असून त्यात शिवसेनेचे 10, भाजपचे 5, राष्ट्रवादीचे 9, अपक्ष 5, बहुजन समाज पक्ष आणि मनसेचा प्रत्येकी 1 तर काँग्रेसचे 23 नगरसेवक आहेत. याच संख्याबळावर गेल्यावेळी काँग्रेसनं जालना नगरपालिकेवर वर्चस्व निर्माण केलं होतं. 


आता ही पालिका ताब्यात घेण्यासाठी शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि काँग्रेसचे माजी आमदारांनी बैठकांचा सपाटा सुरू केलाय. कार्यकर्त्यांच्या बैठकीला वॉर्डा-वॉर्डातून सुरूवात झाली आहे. ही पालिका ताब्यात घेण्यासाठी खोतकरांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. तर काँग्रेसकडूनही मोर्चेबांधणी सुरू झालीय. आघाडी आणि युतीचा निर्णय अजूनही न झाल्यानं स्थानिक नेत्यांकडून स्वबळावर लढण्याची तयारी सुरू झालीय.


सध्या अर्जुन खोतकर राज्यमंत्री असल्यानं या भागात शिवसेनेची ताकद वाढली आहे. मात्र शहरात काँग्रेसचे वजन देखील मोठं असल्यानं काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षात मुख्य लढत होण्याची शक्यताय. मात्र राष्ट्रवादी आणि भाजप या दोन पक्षांच्या नेत्यांनी देखील वॉर्डनिहाय बैठकांनी सुरुवात केली असून शाखा उघडण्याचे कार्यक्रम रोज हाती घेतले जात आहेत.


यावेळी नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडला जाणार आहे. त्यामुळे नगराध्यक्ष होण्यासाठी अनेकांनी बाशिंग बांधले आहे. मात्र या उमेदवारांची नावं सर्वच राजकीय पक्ष ऐन वेळेवर जाहीर करण्याची शक्यताय. जेणेकरून पक्षात बंडाळी होणार नाही. तेव्हा आता या नगरपालिकेत काँग्रेस अस्तित्व टिकवतं की, शिवसेना बाजी मारतं ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.