श्रीरामपूर : सोशल साईटचा वापर सामाजीक कार्यासाठी कसा फायदेशीर ठरु शकतो हे श्रीरामपूर तालुक्यातील एका छोट्याशा खेडेगावानं पटवून दिलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हॉट्सअप, वी चॅट, फेसबुक यातच हल्लीची तरुणाई जगतीय. अगदी खेड्यापाड्यातही या सोशल साईट्सचा चांगलाच बोलबाला आहे. मात्र, या साईट्सचा विधायक कामासाठी कसा वापर करायचा हे पहायचं असेल तर जरा श्रीरामपूर तालुक्यातल्या खंडाळा गावात डोकावून बघा... या गावात व्हॉअॅपच्या कृपेनं जलयुक्त शिवाराचं काम सुरु झालंय.


गावातून प्रवरेचा कालवा वहातो. मात्र, यावर्षी दुष्काळामुळे कालवा कोरडा पडला आणि गावात पाणीबाणी सुरु झाली. अशात भविष्यात हे दिवस पुन्हा नको म्हणून गावातल्या काही तरुणांनी जलयुक्त शिवार योजना राबवण्याचं ठरवलं... 


पण यासाठी त्यांनी शासनाच्या आर्थीक मदतीची वाट पाहिली नाही. तर व्हॉट्स अॅपवर खंडाळा विकास फाऊंडेशन गृप तयार केला.. आणि प्रत्येक सदस्याकडून १२०० रुपये निधी जमा केला. ज्यांना ही रक्कम देणं शक्य झालं नाही त्यांनी यथा शक्ती मदत केली आणि श्रमदानातून गावातील बुजलेल्या ओढ्याचं रुंदीकरण आणि खोलीकरणाचं काम सुरु केलं. 


नाला खोलीकरण आणि रुंदिकरण करताना त्याजवळचा रस्ताही करुन दिल्यानं गावातील शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. एरव्ही गावकीच्या राजकाणामुळे एकमेकांची तोंडंही न पहाणारे गावकरी विकासाच्या कामासाठी मात्र हटकुन एकत्र आलेत आणि नोकरी निमित्त परगावी गेलेल्या तरुणांनीही त्यांना साथ दिलीय... त्यामुळे एक नवा आदर्श या गावातील तरुणाईनं घालून दिलाय.