भुजबळांचा प्रवास... शिवसैनिक ते तुरुंग!
छगन भुजबळ यांची अटक राज्याच्या राजकारणातील एक सगळ्यात मोठी घटना मानली जात आहे. आत्तापर्यंत उपमुख्यमंत्री पदासारख्या मोठ्या पदावर राहिलेल्या व्यक्तीला अटक होण्याची राज्याच्या राजकारणातील ही पहिलीच घटना आहे. या अटकेने भुजबळ नावाचा राज्याच्या राजकारणात मागील पाच दशके असलेला दबदबाही मावळतीकडे झुकू लागलाय.
दीपक भातुसे, मुंबई : छगन भुजबळ यांची अटक राज्याच्या राजकारणातील एक सगळ्यात मोठी घटना मानली जात आहे. आत्तापर्यंत उपमुख्यमंत्री पदासारख्या मोठ्या पदावर राहिलेल्या व्यक्तीला अटक होण्याची राज्याच्या राजकारणातील ही पहिलीच घटना आहे. या अटकेने भुजबळ नावाचा राज्याच्या राजकारणात मागील पाच दशके असलेला दबदबाही मावळतीकडे झुकू लागलाय.
निर्दोषत्व सिद्ध करण्यात अपयशी
राजकारणातील एक लढवय्ये नेते अशी छगन भुजबळ यांची महाराष्ट्राच्या राजकारणातील ओळख... राजकारणात आल्यापासून संघर्ष आणि भुजबळ हे जणू समीकरणच होतं. शिवसेनेत असताना भुजबळांनी संघर्ष केला, त्यानंतर काँग्रेस आणि मागील १५ वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही त्यांचा संघर्ष सुरूच होता. आता भुजबळांचा संघर्ष सुरू आहे तो स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याचा... ईडीने दहा तास चौकशी करून भुजबळांना अटक केल्यानंतर ईडीसमोर तरी आपले निर्दोषत्व सिद्ध करण्यात भुजबळ अपयशी ठरले आहेत.
शिवसेनेनं दिली ओळख...
छगन भुजबळ नावाची ओळख महाराष्ट्राला झाली ती भुजबळ शिवसेनेत असताना. एकीकडे मुंबईत मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारी संघटना म्हणून शिवसेनेचा मुंबई-ठाण्यात विस्तार होत होता. त्याचवेळी भुजबळांनी संघर्ष केला तो शिवसेना महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात पोहचवण्यासाठी...
शिवसेना खऱ्या अर्थाने गावात पोहचली ती भुजबळांमुळे... मुंबईत मेकॅनिकल इंजिनियरिंगमधील पदविका घेतलेले भुजबळ शिवसेनेकडे ओढले गेले... शिवसेनेसाठी केलेल्या संघर्षाचे त्यांना पुढे फळ मिळाले... १९७३ साली भुजबळ मुंबई महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले. नगरसेवकापासून राजकारणात त्यांचा सुरू झालेला प्रवास त्यांना पुढे उपमुख्यंत्रीपदापर्यंत घेऊन गेला.
- १९७३ ते ८४ ते महापालिकेत विरोधी पक्षनेता बनले, तर १९८५ मध्ये महापौर झाले.
- १९९१ मध्ये ते दुसऱ्यांदा मुंबईचे महापौर झाले.
- राजकारणाबरोबरच मुंबईतील नायर हॉस्पिटल, प्रिन्स आगाखान हॉस्पिटल, व्ही. जे. टी. आय. संस्थांवर ट्रस्टी म्हणून त्यांनी काम केले
- वांद्रे येथे मुंबई एज्युकेशनल ट्रस्ट या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली. पुढे या ट्रस्टमध्येही वाद निर्माण झाले आणि ट्रस्टमध्ये घोटाळे झाल्याचे आरोपही भुजबळांवर झाले.
शिवसेना वाढवण्यासाठी भुजबळांनी संघर्ष केला, प्रसंगी लाठ्या-काठ्या अंगावर झेलल्या तीच शिवसेना सोडण्याची १९९१ साली भुजबळांवर वेळ आली. मंडल आयोगावरून १९९१ मध्ये त्यांचे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी टोकाचे मतभेद झाले आणि त्यांनी सेनेला जय महाराष्ट्र केला. शिवसेना सोडल्यानंतर ते काँग्रेसमध्ये आले. शरद पवारांमुळेच ते काँग्रेसमध्ये आले होते.
- १९८५ व १९९० अशा दोन वेळा मुंबईतील माझगावमधून भुजबळ विधानसभेवर निवडून आले.
- नोव्हेंबर १९९१ ते १९९५ या काळात ते महसूल, गृहनिर्माण आणि झोपडपट्टी सुधारणा या खात्याचे मंत्री होते.
- १९९५ च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ते एप्रिल १९९६ मध्ये विधान परिषदेवर निवडून गेले
- शिवसेना-भाजपा युतीचे सरकार असताना विधानपरिषदे विरोधी पक्षनेते झाले.
अनुभवाचं 'बळ' पाठिशी...
१९९९ साली शरद पवारांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली तेव्हा भुजबळ त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीत गेले. एव्हाना भुजबळ राज्याच्या राजकारणातील एक लढवय्या नेता अशी त्यांची ओळख झाली होती. शिवसेना खेड्यापाड्यात पोहचवण्याचा त्यांना अनुभव होताच. त्याच अनुभवावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी शरद पवारांनी भुजबळांच्या खांद्यावर दिली. भुजबळांनीही ती जबाबदारी पार पाडली आणि १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेस बरोबर सत्ता स्थापन केली आणि भुजबळांना त्यांचे फळ मिळाले.
राज्याचे उपमुख्यमंत्री
भुजबळ आघाडी सरकारचे पहिले उपमुख्यमंत्री झाले. १९९९ ते २००४ या पंधरा वर्षाच्या काळात भुजबळ सत्ताकारणात होते. या काळात उपमुख्यमंत्रीपदाबरोबरच अनेक महत्त्वाची खाती त्यांनी सांभाळली. यात गृह, पर्यटन तसंच ज्या खात्यामुळे ते अडचणीत आले ते सार्वजनिक बांधकामे खातेही अनेक वर्ष त्यांच्याकडे होते.
मुंबईतून निवडून येणे अवघड असल्याने २००४ साली भुजबळ येवला मतदारसंघातून विजयी झाले. एकीकडे सत्तेत असलेले भुजबळ ओबीसी समाजासाठीही काम करत होते. त्यासाठी त्यांनी मुंबईत १ नोव्हेंबर १९९२ रोजी महात्मा फुले समता परिषदेची स्थापना केली. समता परिषदेद्वारे देशभरातील ओबीसींना एकत्र करण्याचा प्रयत्न भुजबळांनी केला. त्यासाठी पाटणा, दिल्ली या ठिकाणी त्यांनी भव्य मेळावेही घेतले.
पुतण्या अटकेत... मुलालाही कधीही होऊ शकते अटक
१५ वर्ष मंत्री राहिलेल्या भुजबळांवर या काळात अनेक आरोप झाले. यातील काही आरोपांबाबत भुजबळांविरोधात एफआयआरही दाखल झालेला आहे. मात्र, दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्यात ते चांगलेच अडकले. याप्रकरणी ईडीने त्यांच्याविरोधात मनी लॉन्डरिंग आणि बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी गुन्हा दाखल केला आणि त्यांना अटकही केली. अटकेपूर्वी हे आपल्याविरोधात राजकीय षडयंत्र असल्याचा आऱोप भुजबळ करत होते. भुजबळांच्या आधी त्यांचा पुतण्या समीर भुजबळ यांना अटक झाली आहे, तर मुलगा पंकज भुजबळ याच्याही ईडीकडून चौकशी सुरू आहे.
त्यामुळे संपूर्ण भुजबळ कुटुंबियच या प्रकरणात गोवलं गेलंय. भुजबळ यांना यापूर्वी बेळगाव सीमा लढ्यात अटक झाली होती, पण ती अटक होती राज्याच्या हितासाठी दिलेल्या लढाईसाठी आणि आता भुजबळांना दुसऱ्यांदा अटक झाली आहे ती घोटाळ्यासाठी... या सगळ्यामुळे राज्याच्या राजकारणात बलशाली नेता अशी ओळख असलेल्या भुजबळांची राजकीय कारकीर्दच धोक्यात आली आहे. त्यामुळे आता भुजबळ कुणाशी लढणार आणि कुणाशी संघर्ष करणार...