मुंबई : मान्सून सुरू झाला असतानाच मुंबईकरांना गणेशोत्सवासाठी गावी जाण्याच्या रिझर्वेशनचे वेध लागतात. यासाठी कोकणात रेल्वेने 142 विशेष फे-या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील सीएसटी ते गोव्यातील करमाळी, दादर सावंतवाडी, पनवेल चिपळूण डेमू, दादर ते रत्नागिरी- सावंतवाडी, लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी दरम्यान या विशेष गाड्या चालवण्यात येतील. 


सीएसटी ते करमाळी मार्गावर एकूण दोन गाड्या गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यातील एक गाडी गुरूवार वगळता आठवड्यातून सहा दिवस धावणार आहे. तर दुसरी साप्ताहिक असेल. 


27 ऑगस्टपासून या गाड्या धावणार आहेत. दादर-सावंतवाडी गाडी ही  दि. 26 ऑगस्ट ते 18 सप्टेंबर दरम्यान दर रविवारी, बुधवारी, शुक्रवारी  धावणार आहे. 26 ऑगस्ट ते 24 सप्टेंबर या कालावधीत दादर ते रत्नागिरी  ही गाडी धावणार आहे. या शिवाय लो. टिळक टर्मिनस ते सावंतवाडी दरम्यानही आठवड्यातून तीन दिवस धावणारी गाडी असेल. ही गाडी दि.25 ऑगस्ट ते 25 सप्टेंबर या कालावधीत धावणार आहे. 


या विशेष फेऱ्यांमुळे आता कन्फर्म तिकीट न मिळालेल्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. डेमू गाडीमुळे चिपळूणपर्यंत येणार्‍यांना अवघ्या 45 रुपयात गावी येणे  शक्य होणार आहे. गेल्या वर्षी गणेशोत्सवानंतर ही गाडी कायम ठेवण्याची मागणी करण्यात आली होती. या वर्षी तरी ही मागणी पूर्ण होते का, याकडे प्रवासी जनतेचे लक्ष लागले आहे.