इतिहास घडवणाऱ्या `त्या` महापौरांचं पद धोक्यात
कोल्हापूरच्या नुतन महापौर हसीना फरास यांच्यासह 20 नगरसेवकाचं पद धोक्यात आलंय.
प्रताप नाईक, कोल्हापूर : कोल्हापूरच्या नुतन महापौर हसीना फरास यांच्यासह 20 नगरसेवकाचं पद धोक्यात आलंय.
आरक्षित प्रभागातून निवडणूक लढवून विजयी झालेल्या नगरसेवकांना सहा महिन्यांच्या आत जात प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक असतं. मात्र, कोल्हापूर महापालिकेच्या महापौरांसह तब्बल 20 नगरसेवकांचं जात प्रमाणपत्र अद्याप निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेलं नाही. त्यामुळे 16 डिसेंबरला राज्य निवडणूक आयोगानं राज्य सरकारला जात वैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या नगरसेवकांचं पद रद्द झाल्याबाबात औपचारिक आदेश द्यावेत, असं म्हटलंय. महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनादेखील यासंदर्भात आदेश देण्यात आलेत.
या संदर्भात महापौर हसीना फरास आणि इतर नगरसेवकांना विचारलं असता त्यांनी आपण सर्व कागदपत्रांची पूर्तता केली असून जात पडताळणी विभागानं दाखले दिलेले नसल्याचं सांगितलंय. नगरसेवक पद रद्द झाल्यास कोर्टात दाद मागू, अशी प्रतिक्रिया या नगरसेवकांनी दिलीय.
आयुक्तांनी 2 मे 2016 लाच 20 नगरसेवकांनी सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र दिलं नसल्याचा अहवाल नगरविकास विभागाला पाठवलाय. आता निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर पुन्हा एकदा अहवाल पाठवणार आहेत. त्यामुळं महापौरांसह वीस नगरसेवकांचं पद पुन्हा एकदा धोक्यात आलंय.