वरोरा : पारधी समाजातल्या गरोदर महिलेवर उपचार करण्यास डॉक्टरांनी नकार दिल्यामुळे रुग्णालयाबाहेरच्या रस्त्यावरच ती बाळंत झाल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातल्या वरोरात घडली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुभा शामल पवार यांनी डॉक्टर चांडक यांच्या रुग्णालयाबाहेर रस्त्यावरच एका गोंडस बाळाला जन्म दिला. अवघडलेल्या अवस्थेत तिला रूग्णालयात नेण्यात आलं होतं, पण ती आपली रुग्ण नसल्यानं चांडक रुग्णालयानं तिच्यावर उपचार करायला नकार दिल्यानं तिच्यावर ही वेळ आली, असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केलाय.


केवळ चांडक रूग्णालयच नव्हे तर त्याआधी दोन डॉक्टराकंडे ती जाऊन आली. वरो-यात झोपडपट्टीत राहणाऱ्या शुभाला रात्रीपासूनच प्रसूतीवेदना सुरू झाल्या होत्या. वाहतुकीची कुठलीही सोय नसल्यानं तिनं रात्र कशीबशी काढली. सकाळ होताच त्यांनी शहरातील दवाखाने पालथे घालत डॉक्टर जाजू रुग्णालय गाठलं. डॉ. जाजूंनी तिला इंजेक्शन देत वेदना कमी केल्या आणि परत घरी पाठवलं.


सकाळी वेदना असह्य झाल्यानं तिला जवळच्या डॉ. चांडक हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. मात्र विनंत्या करूनही रूग्णालयानं शुभावर उपचार केले नाहीत, असा आरोप तिनं केला आहे.