भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांना जमिनिचा वाद भोवणार
एकनाथ खडसेंपाठोपाठ आता जळगाव जिल्ह्यातलेच दुसरे मंत्री गिरीश महाजन यांनाही जमिनिचा वाद भोवण्याची चिन्ह आहेत.
जळगाव : एकनाथ खडसेंपाठोपाठ आता जळगाव जिल्ह्यातलेच दुसरे मंत्री गिरीश महाजन यांनाही जमिनिचा वाद भोवण्याची चिन्ह आहेत.
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ इथं तापी पूर्णा साखर कारखान्यासाठी गिरीश महाजन यांनी शेतकऱ्यांकडून जमीन विकत घेतली. ही जमीन घेताना कारखान्यात रोजगार देऊ असं आश्वासन महाजन यांनी शेतकऱ्यांना दिलं. २००२ मध्ये ही जमीन घेतली. मात्र अद्याप इथे कारखाना उभा राहिला नाही.
शेतकऱ्यांची जमीनही गेली आणि रोजगारही मिळाला नाही. विशेष म्हणजे महार वतनाची ही जमीन असून ती खरेदी केलीच कशी, असा सवाल काँग्रेसनं उपस्थित केलाय. विशेष म्हणजे या जमिनिचा कुठल्याच निकवडणूक प्रतिज्ञापत्रात उल्लेख नसल्याचा दावाही काँग्रेसनं केलाय.
महाजन यांची सावरासावर
या प्रकरणाची चौकशी करून मुख्यमंत्र्यांनी महाजन यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. आपण घेतलेली जमीन ही कारखान्यासाठी घेतली होती. त्यामुळे त्याचा उल्लेख निवडणूक प्रतिज्ञापत्रात केला नसल्याचा महाजन यांचा दावा आहे. त्याचबरोबर ही जमीन महार वतनाची नसून जमीन आपण शेतकऱ्यांना परत करायला तयार असल्याची सारवासावर महाजन यांनी केली आहे.