लातूर कन्या श्रद्धा मेंगशेट्टी हिला कॅशलेस व्यवहारासाठी १ कोटींचे पारितोषिक
लातूरच्या श्रद्धा मोहन मेंगशेट्टी या मुलीला ऑनलाईन व्यवहार केल्यामुळे एक कोटीची लॉटरी लागली.
नागपूर : लातूरच्या श्रद्धा मोहन मेंगशेट्टी या मुलीला ऑनलाईन व्यवहार केल्यामुळे एक कोटीची लॉटरी लागली. पुण्यात एसएमएस महाविद्यालयात बीई द्वितीय वर्षात शिकणाऱ्या श्रद्धा मोहन मेंगशेट्टे हिला डीजी धन योजनेअंतर्गत कॅशलेस व्यवहारासाठीचे १ कोटी रुपयांचे पारितोषिक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते वितरीत करण्यात आले.
श्रद्धाने काही दिवसांपूर्वी हप्त्यावर मोबाइलची खरेदी केली होती. त्याचा हप्ताही तिने डिजिटल माध्यमातून भरला होता. कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्राने सुरू केलेल्या विशेष योजनेत तिला १ कोटींचे पारितोषिक मिळाले. तिचे वडील गेल्या अनेक वर्षांपासून किराणा दुकान चालवितात.
श्रद्धाचे लातूरच्या गंजगोलाईतील सेंट्रल बँकेत सहा महिन्यांपूर्वी खाते उघडण्यात आले होते. या खात्याला पारितोषिक लागल्याची माहिती बॅंकेकडून चार दिवसांपूर्वी सांगितले. तिचा पंतप्रधानांच्या हस्ते सत्कार होणार असल्याचे कळविले होते. मात्र पारितोषिक १ कोटीचे असल्याचे सत्कारावेळीच समजले.
नागपुरात तिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान होताच शुक्रवारी लातूरमधील तिच्या घरी नातेवाईकांनी आनंदोत्सव साजरा केला.