तडफडणाऱ्या बिबट्याला पाच तरुणांनी दिलं जीवदान
आंबड - धामणगांव आवारी शिवारात एका बिबट्याला पाच तरुणांनी जिवदान दिलंय.
अकोले : आंबड - धामणगांव आवारी शिवारात एका बिबट्याला पाच तरुणांनी जिवदान दिलंय.
सकाळी ८ वाजण्याचा सुमारास बिबट्याचा डरकाळीचा आवाज कानावर आल्यावर तेथील काही तरुणांनी जाणिवपूर्वक आवाज्याच्या दिशेने जाउन शोध घेतला. त्यावेळी बिबट्या अगदी तडफडताना पाहिला.
वनविभागाचा ढिसाळ कारभार
जवळ जाण्यासाठी कुणाची हिंमत होईना. परंतु एकाने धाडस दाखवून जवळ जाऊन पाहिलं तर बिबट्याचं शरीर धडधड करत होतं. मग सगळे बिबट्याच्या जवळ गेले व सदर घटनेची माहिती वनविभागाला दिली.
तरुणांनीच पोहचवलं दवाखान्यात
परंतु दोन तास उलटून गेले तरी कुठल्याही प्रकारे वनविभागाने दखल घेतली नाही. मग या तरुणांनी निर्णय घेतला... आणी त्यांनी स्वतःच चादरीची खोळी करून बिबट्याला मोटरसायकलवर तातडीने अकोल्यातील दवाखान्यात आणले.
वेळेत मिळाले उपचार
धक्कादायक म्हणजे, इथंही कोणताही अधिकारी फिरकला नाही. तेथील वॉचमन व डॉक्टरांनी तातडीने इंजेक्शन, सलायन लावून बिबट्याला सुंगाव येथील नर्सरीत त्या मुलांनाच मोटारसायकलवर पाठवलं... त्यामुळे बिबट्याला वेळीच उपचार उपलब्ध झाले.
तरुणांच्या धाडसाचं कौतुक
प्रल्हाद हासे, प्रविन हासे, भुषन आवारी, शिवाजी आवारी, संदीप आवारी असे धाडसी युवकांचे नाव आहे. या पाचही तरुणांच्या धाडसाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे.
बिबट्याची प्रकृती गंभीर
परंतु बिबट्याची परिस्थितीत सुधारणा होताना दिसत नाहीय. अजूनही त्याची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येतंय. बिबट्याला ताप आल्याने बिबट्या आजारी पडला असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.