विशाल वैद्य, कल्याण :  पोलीस गुन्ह्याच्या तपासासाठी खबऱ्यांची मदत घेतात. गुन्हा घडल्यानंतर किंवा गुन्हा घडण्यापूर्वी खबरे पोलिसांना माहिती देतात. पण, पोलिसांना मदत करणाऱ्या एका खबऱ्याला पोलिसांचा वेगळा अनुभव आलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

(खरं नाव जाहीर केलं जाऊ शकत नाही) या खबऱ्यानं पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. सोन्याच्या तस्करीची पोलिसांना खबर देणाऱ्या या खबऱ्यावर पश्चाताप करण्याची वेळ आलीय. ज्या पोलिसांना खबर दिली होती त्यांच्यापासूनच आपल्याला धोका असल्याचा आरोप या खबऱ्यानं केलाय.


त्याच्या म्हणण्यानुसार बँकॉकहून स्मगलिंगचं सोनं येणार असल्याची माहिती त्याने कल्याणमधील महात्मा फुले चौकीला दिली होती. पण, पोलिसांनी तस्करांशी हातमिळवणी करुन आपल्यालाच चोरीच्या आरोपात गुंतवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप या खबऱ्यानं केलाय. आपल्याला काही झालं तर त्याला जबाबदार पोलीसच असतील असंही त्यानं म्हटलंय. 


तिघांना अटक


या सोन्याच्या तस्करी प्रकरणी खबऱ्यानं प्रसार माध्यमांकडे धाव घेतल्यानंतर राजेश आहुजा, नितीन सुतार आणि हिना पोपटानी या तिघांना अटक करण्यात आलीय. महात्मा फुले पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोवार यांनी या तिघांच्या अटकेच्या बातमीला दुजोरा दिलाय. 


पोलिसांनी फेटाळले आरोप


सोने तस्करांकडून वीस लाख रुपये घेवून पोलिसांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप खबऱ्यानं केलाय. या देवाघेवाणाची चित्रफित आपल्याकडं असल्याचा दावा खबऱ्यानं केलाय. पोलिसांनी मात्र त्याचा दावा फेटाळलाय. 


का लागले १६ तास?


पोलिसांनी खबऱ्याच्या आरोपाचं खंडण केलं असलं तरी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी १६ तास का लागले? या प्रश्नाचं उत्तर मात्र पोलिसांकडं नाही. त्यामुळं या प्रकरणातील पोलिसांवर संशयाचं धुकं आणखीणचं गडद झालंय.