सातारा : भावकीतल्या मुलीशी प्रेम विवाह केल्याच्या रागातून मुलीकडच्या लोकांनी मुलाच्या कुटुंबावर हल्ला केलाय. त्यात मुलाच्या वडिलांसह तिघे जण जखमी झालेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साताऱ्याच्या गजवडी इथं ही घटना घडलीय. विनायक कदम नावाच्या मुलानं चार वर्षांपूर्वी भावकीतल्या चुलत बहिणीशी लग्न केलं होतं. गावाच्या यात्रेसाठी आल्यानंतर हा प्रकार घडला.


चार वर्षांपूर्वी लग्न


आपल्या मुलीने भावकीतीलच एकाशी पळून जाऊन प्रेमविवाह केला म्हणून हा हल्ल्या करण्यात आलाय. चार वर्षांपूर्वी लग्न केल्यानंतर हे जोडपे प्रथमच यात्रेसाठी गावात आले होते. विनायक कदम याने गावातीलच उषा हिच्याशी २०१२ मध्ये प्रेमविवाह केला. भावकीत लग्न झाल्याने उषाकडील मंडळी चिडून होती. लग्न झाल्यानंतर विनायक कधीच गावाला आला नाही. लग्नाला चार वर्षे झाली. मुलगाही झाला. आता सगळ्यांचाच राग गेला असेल असे समजून ग्रामदैवताच्या दर्शनाला आला होता.


असा हल्ल्याचा प्रयत्न!


रात्री साडेदहाच्या सुमारास विनायकच्या घराकडे हातात कुऱ्हाड, दांडकी, गज घेऊन मुलीकडची मंडळी येत असल्याचे विनायकचे वडील शंकर कदम यांनी पाहिले. प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी तातडीने मुख्य लोखंडी दरवाजा आतून बंद करून घेतला.


डोक्यात कुऱ्हाडीचे वार


संतप्त झालेल्या या मंडळींनी दारावर पहार आणि दगड मारून तो तोडण्याचा प्रयत्न केला. तो न तुटल्याने मागच्या लाकडी दाराकडे मोर्चा वळविला. मागचे दार तोडल्यानंतर विनायकचे वडील पुढे धावले. त्यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केल्यानंतर रक्ताच्या थर उडालेत. 


यांच्यावर हल्ला


संतप्त जमावाने घरात असलेल्या विनायक आणि उषा यांच्यासह सर्वांना त्यांनी बेदम मारहाण केली. पोलीस पाटील अमन पटेल यांनी तातडीने तालुका पोलीस ठाण्यात माहिती दिली. जखमी शंकर वामन कदम, पार्वती शंकर कदम, दिनकर वामन कदम, विनायक शंकर कदम आणि सुनंदा शंकर कदम यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.


यांना झाली अटक


याप्रकरणी मुंबई पोलिसांत काम करणारा काका दिनकर नामदेव कदम, शंकर नामदेव कदम, लता शंकर कदम, अनिता दिनकर कदम, अश्विन शंकर कदम यांना अटक करण्यात आली आहे.