कोल्हापूर : महावितरणच्या कर्मचाऱ्यांसाठी जिवाची जोखीम नवी नाही. आज त्यांनी चक्क पंचगंगा नदीच्या महापुरात जाऊन वडणगे व निगवे गावांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्याची जोखीम पत्करली. महाप्रलय समोर असताना वीज कर्मचाऱ्यांनी वीजपुरवठा सुरु करण्यात यश मिळवले. त्यासाठी त्यांना अशोक रोकडे यांच्या ‘व्हाईट आर्मी’ची मोलाची मदत मिळाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कसबा बावडा परिसरातील शुगर मिल ३३/११ केव्ही उपकेंद्रातून वडणगे व निगवे या गावांना वीजपुरवठा केला जातो. त्यासाठी पंचगंगा नदीचा पात्र ओलांडून आणि शेजारुन वडगणे ११ केव्ही गावठाण वाहिनी टाकलेली आहे. या वाहिनीचे २० पेक्षा जास्त खांब १० ते १२ फूट पाण्यात आहेत. बुधवारी सकाळी ८.३० च्या सुमारास वडणगे वाहिनी बंद पडली.



दोन्ही गावे मोठी असल्याने वीजपुरवठा सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. निगवे शाखेचे कनिष्ठ अभियंता श्री. विवेक लाठकर व वडणगे शाखेचे कनिष्ठ अभियंता श्री. प्रशांत सासणे यांनी जनमित्रांना सोबत घेऊन जिथे पोहोचता येते तेथपर्यंतचा बिघाड शोधला पण तो सापडला नाही. त्यामुळे नदीपात्रातील वाहिनी तपासणे आवश्यक होते. त्यासाठी त्यांनी श्री. अशोक रोकडे यांच्या ‘व्हाईट आर्मी’ ची मदत मागितली. त्यांनी श्री. प्रशांत शेडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे १५ जवान आणि एक बोट दिली. त्यांच्या मदतीने अभियंते सुलतान शेळके, प्रशांत सासणे आणि विवेक लाठकर यांच्यासह जनमित्र प्रवीण गुरव, बाबासाहेब साठे, अमर कोळी तसेच ‘व्हाईट आर्मी’चे ५ जवान यांनी त्यांची बोट प्रवाहात घातली. काहींनी त्यांना काठावरुन आवश्यक ती मदत पुरवली. बोटीतून तपास मोहीम सुरु असताना एका पोलवरील तार निखळून शेजारील बंद असलेल्या पर्यायी लाईनवर पडल्याचे आढळून आले. केवळ ५ ते ६ फूट इतकाच पोल शिल्लक होता. जिवाची पर्वा न करता त्या पोलवर चढून जनमित्रांनी लाईन पूर्ववत केली. तेंव्हा सर्वांनाच पत्करलेल्या जोखीमेचा आनंद गगनात मावेनासा झाला.



जनमित्र आणि अभियंत्यांनी मिळून केलेल्या कामगिरीचे मुख्य अभियंता श्री.शंकर शिंदे, अधीक्षक अभियंता श्री. जितेंद्र सोनवणे, कार्यकारी अभियंता श्री. राजेंद्र हजारे आणि कदमवाडीचे उपकार्यकारी अभियंता श्री. भिकाजी भोळे यांनीही अभिनंदन केले आहे. महावितरणलाही या कर्मचाऱ्यांचा सार्थ अभिमान आहे.