नाशिक : आश्रमशाळेत शिकून दहावीत ९२ टक्के मिळविणा-या नितीन आहेरला चाकणच्या महिंद्रा कंपनीच्या कर्मचा-यांनी दत्तक घेतलंय. त्याचं संपूर्ण शिक्षण आणि इतर खर्चाची जबाबदारी ते उचलणार आहेत. झी मीडीयाच्या 'संघर्षाला हवी साथ' या आव्हानाला प्रतिसाद दिल्यानं नितीनचं डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे जिल्ह्यातील चाकणमधील महिंद्रा कंपनीत काम करणारे हे कर्मचारी..... आयटीआयची तांत्रिक पदवी घेऊन पुण्यात स्थिरावलेत. प्रतिकुल परिस्थितीवर मात करत यश मिळविणा-या नितीन आहेरच्या संघर्षाची कहाणी 'झी २४ तास'वर बघितल्यावर यासर्वांच्या मनाला पाझर फुटला. केवळ पैसे देऊन मदत न करता त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतला. 


आपल्या तोकड्या पगारातून मदत करण्याची या कर्मचा-यांनी दाखवलेली तयारी निश्चितच कौतुकास्पद आहे. नाशिक जिल्ह्यातील सह्याद्रीच्या परिसरात राहणा-या आहेर कुटुंबाला या आर्थिक मदतीमुळे उभारी मिळाली आहे.


'झी मीडीया' आणि महिंद्रा कंपनीच्या कर्मचा-यांनी आपली सामाजिक जबादारी पूर्ण केली आहे. आता या विद्यार्थ्यांना मदतीचा हाथ देण्याची वेळ आपली आहे.